महाविकास आघाडीचा वाद 'तीन हात नाक्या'वर, काँग्रेसच्या बॅनरमुळे राजकीय खळबळ

पूजा विचारे
Monday, 31 August 2020

महाविकास आघाडी सरकारचं  एक नाराजी नाट्य पाहायला मिळतं आहे. ठाण्यातील एका पोस्टरवरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. 

मुंबईः राज्यात सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. तीन पक्ष एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असं मिळून महाविकास आघाडी सरकारची सत्ता आहे. दरम्यान आता राज्यातल्या राजकारणाला वेगळं वळण लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महाविकास आघाडी सरकारचं  एक नाराजी नाट्य पाहायला मिळतं आहे. ठाण्यातील एका पोस्टरवरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. 

ठाण्यात लावलेल्या एका बॅनरवर फक्त दोनच पक्षातील नेत्यांचे फोटो लावल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.  ठाण्यातल्या काँग्रेसने, आम्ही पाठिंबा दिला नसता तर ठाकरे सरकार सत्तेवर आले असते का? अशा आशयाचा पोस्टर लावलं आहे आणि खुलेपणानं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय झालं? 

आताच झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यसरकारने एमएमआर क्षेत्रातील ८ महापालिका आणि ७ नगरपालिकांसाठी स्वतंत्र एसआरए प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला.  मुंबई सोडून या महानगरपालिका मधील नागरिकांचे विनामूल्य घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होईल. सरकारच्या या निर्णयाचं ठाणे जिल्ह्यातून स्वागत करण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयावर आभार व्यक्त करणारा एक बॅनर स्लम डेव्हलपर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनने तीन हात नाक्यावर लावला आहे. या बॅनरवर "ठाकरे सरकारची वचनपूर्ती" असं लिहिलं आहे.

अधिक वाचाः पालघर साधू हत्याकांड प्रकरणः  तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे बडतर्फ

यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला आहे. याच बॅनर वर स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे.  मात्र, या बॅनरवर थोरात यांचा फोटो अत्यंत छोटा लावण्यात आल्यानं काँग्रेसने नाराजी व्यक्त केलीय. 

 

त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसनं या बॅनरच्या बाजूलाच तेवढाच मोठा बॅनर लावून सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं?, असा सवाल उपस्थित केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर जनकल्याण करणारे ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का?" असा थेट प्रश्न विचारून आपली नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हा बॅनर लावलेला असून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या दोघांवर खरमरीत टीका देखील त्यांनी केली आहे. ठाणे शहर काँग्रेस कमिटीने हे बॅनर लावले आहे.

हेही वाचाः घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे पाहिल्यावर समजलं की...शिवसेनेचा भाजपला चिमटा

दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी या पोस्टरबाजीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वतः कदम यांनी हे पोस्टर ट्विट करत  तुमच्या तीन पक्षांच्या आपापसातील भांडणांमध्ये महाराष्ट्राचे वाटोळं केलं अशी टीका केली आहे.

Mahavikas aghadi Dispute banner war congress Angry Thane


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas aghadi Dispute banner war congress Angry Thane