वाशीत ‘मधुरांगण’तर्फे ‘महाझिम्मा, मोदक बनवा स्पर्धा’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

‘सकाळ मधुरांगण’ व माधवबाग व श्रीमंत गावदेवी, मरीआई मंदिर ट्रस्ट, जुहूगाव-वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाझिम्मा व मोदक बनवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.१७) सायं. ४.३० वाजता नवी मुंबईतील वाशी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नवी मुंबई : सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हरवलेल्या मंगळागौरीच्या आठवणी, स्त्रियांना रोजच्या व्यस्त जीवनातून विरंगुळा मिळावा, आपल्या परंपरा-संस्कृती यांचे पुढच्या पिढीला महत्त्व कळावे, यासाठी महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘सकाळ मधुरांगण’ व माधवबाग व श्रीमंत गावदेवी, मरीआई मंदिर ट्रस्ट, वाशी-जुहूगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाझिम्मा व मोदक बनवा स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.१७) सायं. ४.३० वाजता नवी मुंबईतील वाशी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक मराठमोळ्या वातावरणात नऊवारीचा साज लेऊन आपले वय विसरून या ‘महाझिम्मा व मोदक बनवा स्पर्धे’त सहभागी होण्याचे आवाहन ‘सकाळ मधुरांगण’तर्फे करण्यात आले आहे. 

या वेळी माधवबाग मल्टिडिसिप्लिनरी कार्डियाक केअर क्‍लिनिक्‍स ॲण्ड हॉस्पिटल्सचे डॉ. नीलेश कुलथे, डॉ. हर्षदा मेखले, डॉ. अमोल खेले हे स्त्री-आरोग्यविषयक मार्गदर्शन करतील. महिलांनी कुटुंबासोबतच स्वतःची काळजी कशी घ्यावी, हृदयरोग होऊ नये म्हणून काय उपचारपद्धती द्यावी व तो कसा टाळता येईल, याची खेळीमेळीच्या वातावरणात माहिती देण्यात येणार आहे. 

लवकरच येणाऱ्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाच्या स्वागताकरिता ‘मोदक बनवा स्पर्धा’ घेण्यात येणार असून, खालील गोष्टींची पूर्तता स्पर्धकांनी करावी, असे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. स्पर्धकांनी मोदक घरी बनवून आणणे, स्पर्धास्थळी स्पर्धकांनी मोदकाची कृती कागदावर लिहून आणावी,  मोदक हातांनी बनविलेले असावेत, कार्यक्रमस्थळी स्पर्धकांनी ४ वाजता पोहोचावे, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या कार्यक्रमाकरिता गावदेवी, मरिआई मंदिराच्या मनीषा रमण भोईर यांचे सहकार्य लाभले आहे. परीक्षक म्हणून सारिका गंभीर व स्मिता राव जबाबदारी पार पाडणार आहेत. मोदक बनवणाऱ्या स्पर्धकांनी खालील संपर्कावर नाव नोंदवावे -ः ९८५०१३५०१३. हा कार्यक्रम सर्व मैत्रिणांकरिता खुला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Mahazimma, Modak Make Contest' by Madurangan' in vashi