महेश बालदींच्या उमेदवारीमुळे विरोधकांचे धाबे दणाणले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबई : भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बालदी यांनी अर्ज मागे घ्यावा, याकरिता विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु बालदी यांनी माघार न घेतल्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले आहेत. महेश बालदी यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उरणच्या विकासासाठी अर्ज कायम ठेवत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उरण मतदारसंघात बालदींच्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकू लागल्याचे सोनारी गावच्या सरपंच पूनम महेश कडू यांनी सांगितले. 

केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक वर्षे अंधारात चाचपडत पडलेल्या घारापुरी बेटावर विद्युत रोषणाई करण्याचे महत्त्वाचे काम बालदी यांनी केले. तसेच ज्येष्ठ प्रबोधनकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत दास्तान फाटा येथे विश्वातील पहिले शिवसमर्थ स्मारक उभारण्याचे कामही त्यांनीच केले. यासह उघड्यावर शौचाला जाणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह, जेएनपीटी बंदराच्या माध्यमातून रस्त्याचे कॉंक्रीटीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण, उरण नगरपालिका हद्दीत अनेक विकासकामे, कोळी समाजासाठी सुसज्ज जेटीसह इतर अनेक जनहिताचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम बालदी यांनी केल्याचे पूनम कडू यांनी सांगितले. काम करताना कोणत्याही प्रकारे जातीपातीचे राजकारण न करता समाजकारण हाच एकमेव ध्यास बालदी यांनी घेतला आहे. तसेच उरणकरांसाठी अतिमहत्त्वाचा असणारा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम हाती घेतले असल्याने उरणकरांचे नेतृत्व महेश बालदी यांनी करण्यासाठी निवडणुकीला समोरे जावे, अशी हाक कार्यकर्त्यांनी दिली. त्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महेश बालदी हे कोणत्याही प्रकारचे जातीपातीचे राजकारण न करता "मी या मतदारसंघाचा, या मतदारसंघातील जनता माझी' हे एकच ब्रीदवाक्‍य आत्मसात करून निवडणूकीला सामोरे जात आहेत. 

अपक्ष उमेदवार महेश बालदी यांच्या जनमानसात वाढत्या प्रभावाचा धसका घेतलेल्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सध्या सरकू लागली असल्याचे चित्र गावागावात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे महेश बालदी हे निश्‍चित जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने व कार्यकर्ते यांच्या एकदिलाने सुरू असणाऱ्या प्रचारांनी विरोधकांची शिटी ही आपल्या शिटी या निशाणीच्या माध्यमातून वाजवणार, हे मात्र खरे आहे. 
- पूनम कडू, सरपंच, सोनारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahesh Baladi Candidate news