महेश भट्ट यांना धमकी देणारा अटकेत

k
शुक्रवार, 3 मार्च 2017

मुंबई - गुंड बबलू श्रीवास्तवच्या नावाने चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने नुकतीच अटक केली. संदीप साहू असे त्याचे नाव आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुंबई - गुंड बबलू श्रीवास्तवच्या नावाने चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष कृती दलाने नुकतीच अटक केली. संदीप साहू असे त्याचे नाव आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मोबाईलवरून धमकी आल्याची तक्रार भट्ट यांनी जुहू पोलिस ठाण्यात नोंदवली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष कृती दलही करत होते. या दलाचे सहायक आयुक्त पी. के. मिश्रा, निरीक्षक राजेश त्रिपाठी, उपनिरीक्षक ज्ञानंदकुमार राय, निरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणाऱ्या पथकाने 24 तासांत आरोपीला लखनऊ येथून अटक केली.

आठवीपर्यंत शिक्षण झालेला साहू काही महिन्यांपूर्वी खासगी कंपनीत कामाला होता. नोकरी सुटल्यानंतर त्याने बूट विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी घेतलेले 12 लाख रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने तो निराश झाला होता. कर्ज देणारे पैशांसाठी घरी येत असल्याने त्याने हे पाऊल उचलले.

क्राइम सीरियल पाहून सुचली कल्पना
व्यवसायानिमित्त मुंबईत राहणाऱ्या साहूने इंटरनेटवरून हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांचे मोबाईल क्रमांक मिळवले होते. बबलू श्रीवास्तवची गुन्हे जगतात दहशत असल्याचे त्याला माहीत होते. श्रीवास्तव सध्या तुरुंगात असल्याचा फायदा घेत त्याने भट्ट यांच्यासह अनेकांना धमकीचे दूरध्वनी केले. क्राइम सीरियल पाहून ही कल्पना सुचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

बनावट नावाने सीमकार्ड खरेदी
साहूने जानेवारीत मुसबीर या बनावट नावाने सीमकार्ड खरेदी केले. 10 ते 14 फेब्रुवारीदरम्यान त्याने सीमकार्डचा वापर करत अनेकांना मेसेज आणि फोनही केले. पोलिसांनी पकडू नये यासाठी त्याने जुना मोबाईल क्रमांक बंद केला होता.

बॅंक खात्यामुळे साहू अडकला
साहूने भट्ट यांना खंडणीची रक्कम त्याच्या बॅंक खात्यात भरण्यास सांगितले होते. हे खाते उत्तर प्रदेशमधील बॅंकेतील असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्या बॅंकेत संपर्क साधल्यानंतर साहूचा मोबाईल क्रमांक मिळाला; मात्र तो क्रमांक बंद असल्याचे तसेच त्याने लखनऊतील राहते घर सोडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. साहू लखनऊमधील आसियाना परिसरात भाड्याच्या घरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली.

Web Title: Mahesh Bhatt, who was arrested for threatening