माहिममधील वृद्धाच्या हत्येचे गूढ उकलले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई - माहिममधील एका घरात शुक्रवारी (ता. 24) वृद्ध दाम्पत्य जखमी अवस्थेत सापडले होते. यामधील वृद्धाचा मृत्यू झाला होता. त्या दोघांवर अनोळखी व्यक्तीने हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता; परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात कौटुंबिक वादातून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. 

माहीम परिसरात राहणारे शफिक खान हे ट्रकवर चालक म्हणून काम करत होते. तुटपुंज्या कमाईतून घरखर्च भागवणे शक्‍य होत नसल्याने शफिक आणि त्यांची पत्नी हलीमुनीसा यांच्यात वारंवार भांडण होत असे. त्यांच्यात शुक्रवारी पुन्हा भांडण झाले. या वेळी राग अनावर झालेल्या शफिक यांनी हलीमुनीसाला मारहाण केली. त्यामध्ये ती जखमी झाली. त्या वेळी हनीमुनीसालाही राग अनावर झाल्याने तिने घरातल्या पेव्हर ब्लॉकने शफिकच्या डोक्‍यात दोन ते तीनवेळा हल्ला केला. यामुळे शफिक तेथेच रक्तबंबाळ अवस्थेत पडले. तर हलीमुनीसाही गंभीर जखमी झाली. हलीमुनीसाने आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

या घटनेनंतर त्यांच्या मुलीने शेजाऱ्यांच्या मदतीने तत्काळ आई-वडिलांना लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले; मात्र शफिक यांचा मृत्यू झाला. तर हलीमुनीसा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हलीमुनीसा शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप थोरात यांनीही वृत्ताला दुजोरा दिला. 

Web Title: mahim murder case