आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा अरबी समुद्रात सराव सुरु 

कृष्ण जोशी
Tuesday, 17 November 2020

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा अरबी समुद्रात आजपासून सुरु झाला

मुंबई : भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नौदल कवायतींचा मलबार 2020 चा दुसरा टप्पा अरबी समुद्रात आजपासून सुरु झाला. येत्या शुक्रवारपर्यंत ( 20 नोव्हेंबर ) हा दुसरा टप्पा सुरु राहणार आहे. अत्यंत आधुनिक पद्धतीने लढल्या जाणाऱ्या हायटेक युद्धाचा सराव यात होणार आहे.  

या कवायतींचा पहिला टप्पा नुकताच तीन ते सहा नोव्हेंबरदरम्यान बंगालच्या उपसागरात झाला होता. 1992 पासून भारत व अमेरिका यांच्या नौदलांमध्ये दरवर्षी होणाऱ्या मलबार नौदल कवायतींचे हे 24 वे वर्ष आहे. दरवर्षी या कवायतींच्या व्याप्तीमध्ये वाढ होत आहे. 

महत्त्वाची बातमी : 'स्मारक की मातोश्री तीन??'; मनसे नेत्याचा शिवसेनेला खोचक सवाल

या कवायतींमध्ये भारताची विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्य आणि तिचा ताफा तसेच अमेरिकी बलाढ्य विमानवाहू नौका निमित्झ व तिचा ताफा प्रमुख्याने सहभागी आहे. त्याखेरीज पाणबुड्या आणि लढाऊ विमानांच्या साह्याने उच्च तंत्रज्ञानाचा समावेश असलेला सागरी युद्धसराव केला जाणार आहे. यात शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून बचाव करण्याचे कौशल्य मिग 29 के ही विक्रमादित्य वरील विमाने तसेच निमित्झ वरील एफ 18 आणि ई 2 सी हॉक आय ही लढाऊ विमाने दाखवतील. तसेच पाणबुडीवर आणि जहाजांवर तसेच जमिनीवरील लक्ष्यांवर हल्ले करण्याचे युद्धतंत्रही अजमावले जाईल. अशा युद्धसरावांमध्ये या वेगवेगळ्या देशांच्या नौदलांमध्ये समन्वय साधला जातो. 

महत्त्वाची बातमी : बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

या युद्धसरावात भारताची विनाशिका चैन्नै व कोलकाटा, शत्रूच्या रडारवर न दिसणारी फ्रिगेट तलवार, भारतात निर्मिलेली पाणबुडी खांदेरी, सागरी टेहळणी विमान पी 8 आय, इंधनवाहू नौका दीपक सहभागी होत आहे. नौदलाचे रिअर ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथक युद्धसरावात सहभागी होत आहे. निमित्झच्या ताफ्यात प्रिंसेटोन ही क्रूझर आणि स्टेरेट ही विनाशिका असेल, तर ऑस्ट्रेलियाच्या नौदलाची बॅलार्ट ही फ्रिगेट सहभागी होत आहे.

malabar naval exercise 2020 phase two starts in Arabian sea


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malabar naval exercise 2020 phase two starts in Arabian sea