मालवणी इमारत दुर्घटना: मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदतीचा हात

पूजा विचारे
Friday, 17 July 2020

मुसळधार पावसामुळे  मालाड मालवणी येथे नुरी मशीद जवळील तळमजला अधिक दुमजली घर कोसळलं. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईः मुसळधार पावसामुळे  मालाड मालवणी येथे नुरी मशीद जवळील तळमजला अधिक दुमजली घर कोसळलं. या दुर्घटनेत दोन ठार तर १३ जण जखमी झालेत.  या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

या दुर्घटनेबाबत आदित्य ठाकरे यांनी संबंधीत सर्व यंत्रणांशी संपर्क साधून दुर्घटनेची माहिती घेतली. आपत्तीग्रस्तांना सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावी. तसंच घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसंच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना त्यांनी महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिल्या. 

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत देण्यात येणार असून जखमींना प्रत्येकी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सांगण्यात आलं आहे. 

या दुर्घटनेमध्ये इतर 13 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करुन त्यांना सोडण्यात आलंय. तसेच दुर्घटनेत ढिगाऱ्यात अडकलेल्याची सुटका करण्यात आलीय. 

गुरुवारी दुपारी  २ वाजून ३८ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड भागातील नुरी मशीदजवळील  गेट क्रमांक पाच गेट नंबर-५ जवळ तळमजला अधिक दुमजली घर कोसळले. घटना समजताच अग्निशमन दल, महापालिका कामगार, पोलिस यांच्यासह स्थानिक नागरीकांच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तातडीने मदतीचे काम सुरु करण्यात आलं. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. इतर १३जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मलबा उपसण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होतं.

malad house collapse two killed aditya thackeray announce 4 lakh family 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malad house collapse two killed aditya thackeray announce 4 lakh family