ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

ठाणे - अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी फरारी आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची अंधेरी येथील संपत्ती जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. काही महिन्यांपूर्वीच यासंबंधीची मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. आता तसे आदेश दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

ठाणे पोलिसांनी 2016 मध्ये "इफेड्रीन' या अमली पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे मोठे रॅकेट उद्‌ध्वस्त केले होते. दोन हजार कोटींच्या या रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी व तिचा पती विकी गोस्वामी यांची नावे पुढे आली होती. दोन वर्षांपासून तिचा शोध लागत नसल्याने न्यायालयाने तिला व तिच्या पतीला फरारी घोषित केले होते. त्यानंतर पोलिसांनी नोटीस बजावून तसेच मुदत देऊनही हे दोघे आरोपी हजर होत नसल्याने विशेष सरकारी वकील ऍड. शिरीष हिरे यांनी ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार 17 एप्रिलला विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही आरोपींना पुरेसा वेळ दिल्याचे निरीक्षण नोंदवीत ममता कुलकर्णी हिचे अंधेरीतील तीन फ्लॅटना सील ठोकून, जप्तीचे आदेश त्यांनी दिले आहेत.

वीस कोटींचे फ्लॅट
ममता कुलकर्णीचे अंधेरी येथील वर्सोवा भागात "स्काय इन्क्‍लेव्ह' या संकुलात तीन फ्लॅट आहेत. त्यातील पहिल्या मजल्यावर एक, दुसऱ्या मजल्यावर एक व सातव्या मजल्यावर एक असे तीन फ्लॅट आहेत. या फ्लॅटची एकूण किंमत 20 कोटी रुपये इतकी आहे.

Web Title: mamta kulkarni property seized order crime court