
प्रेम उठलं जीवावर, प्रेयसीची हत्या करून मृतदेह फेकला समुद्रकिनारी
मुंबई : गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका तरुणीचा मृतदेह वर्सोवा समुद्रकिनारी (Mumbai Crime News) आढळून आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा छडा लावला असून प्रियकरानेच हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी प्रियकर मोहम्मद अंसारी (२३) याला पोलिसांनी अटक केली आहे.
सोनम शुक्ला (१९) असे मृत तरुणीचे नाव होते. आरोपी प्रियकर अंसारी हा सोनमच्या शेजारी राहत होता. तो सध्या पदवीचे शिक्षण घेत असून सोबतच बेकरी देखील चालवतो. बेकरीमध्ये सामान खरेदी करण्यासाठी गेल्यावर सोनमची अंसारीसोबत मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. २५ एप्रिल रोजी पीडित मुलगी दुपारी ४ वाजता ट्युशनला गेली आणि नंतर गोरेगाव (प.) येथील राहत्या घराजवळील तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. ती मैत्रीणीला घरी जात आहे, असं सांगून निघाली. पण, ती तेथून अंसारीला भेटायला त्याच्या घरी गेली. त्यावेळी तेथेच दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात अंसारीने केबलच्या वायरने सोनलचा गळा घोटला.
मुलगी घरी न पोहोचल्याने पालकांनी तिला शोधण्यास सुरुवात केली आणि अपयश आल्यानंतर त्यांनी गोरेगाव पोलिस स्थानकात सोनमची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर तिचा मृतेदह वर्सोवा समुद्रकिनारी आढळून आला. सोनम ही वैद्यकीय शिक्षणाची तयारी करीत होती. अवघ्या दोन महिन्यानंतर तीची NEET ची परीक्षा होणार होती.