मांदेलींची बम्पर लॉटरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

एका बोटीतून सुमारे 300 किलो अशा 15 बोटीतून सुमारे 4 हजार 500 पेक्षा अधिक किलो मांदेली जाळ्यात सापडली आहेत. 

अलिबाग : पावसाळी बंदीनंतर सुरू झालेल्या मासेमारीच्या पहिल्याच फेरीत अलिबागमधील मच्छीमारांना तब्बल 4 हजार 500 किलो मांदेलीची बम्पर लॉटरी लागली आहे. या लॉटरीमुळे 15 बोटींचे मालक मालामाल झाले आहेत. 

पावसाळ्यातील वादळी वाऱ्यामुळे जुलैअखेरपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी होती. आता बंदी संपुष्टात आल्यानंतर रायगड जिल्ह्यातील मच्छमार नव्या जोशात मासेमारीसाठी समुद्रात उतरले आहेत. अलिबाग कोळीवाड्यातील मच्छीमार त्यामध्ये अग्रभागी आहेत. त्यांच्या जाळ्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. त्यात मांदेलीचा मोठा वाटा आहे. 

एका बोटीतून सुमारे 300 किलो अशा 15 बोटीतून सुमारे 4 हजार 500 पेक्षा अधिक किलो मांदेली जाळ्यात सापडली आहेत. 

दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत किनारी बोटी लागल्या होत्या. त्यामुळे मांदेली काढण्यासाठी महिला व पुरुष मग्न होते. 
मांदेलीच्या या बम्पर लॉटरीमुळे 15 बोटींचे मालक मालामाल झाले आहेत. त्यांनी या लॉटरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 

मासेमारीवरील बंदी संपुष्टात आल्यानंतर सुरुवातीला अतिवृष्टीमुळे चार दिवस मासेमारी करता आली नाही. तीन दिवसांपासून पाऊस कमी झाल्याने पुन्हा सुरुवात झाली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात मांदेली, लहान बोंबील सापडत आहेत. 
- शेषनाथ कोळी, अध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandeli Bumper Lottery