मांडूळविक्रीसाठी आलेल्या दोघांना कांदिवलीत अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुटका करण्यात आलेल्या या सापाची काळ्या बाजारात किंमत दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई - मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुटका करण्यात आलेल्या या सापाची काळ्या बाजारात किंमत दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मांडूळाची विक्री करण्यासाठी दोन जण कांदिवलीत येणार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कांदिवली पश्‍चिमेकडील महावीरनगर पोलिस चौकीच्या मागील मैदानात सापळा रचून सुनील मारुती माने (25, रा. भांडुप) व संतोष रामचंद्र अहिरे (30, रा. गोरेगाव) यांना ताब्यात घेतले. मांडूळ जातीचा दुर्मीळ साप सापडल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अंधश्रद्धेतून जादूटोण्यासाठी या सापाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे काळ्या बाजारात त्याला मोठी मागणी आहे. परदेशात औषधासाठी वापर होत असल्यामुळे त्याची तस्करी केली जाते. पोलिसांनी या दोघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी यापूर्वीही अशा पद्धतीने सापांची विक्री केली होती का, याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Mandul Sailer Arrested Crime