बेलापूरमध्ये मंगळागौरीचा जागर जल्लोषात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पारंपरिक दागिने आणि नऊवारीचा साज लेऊन मराठमोळ्या वातावरणात आपले वय विसरून आनंदाने नाचत, विविध खेळ व झिम्मा खेळत सकाळ मधुरांगणच्या महिलांनी बेलापूर येथील सकाळच्या कार्यालयात शनिवारी (ता.१०) जल्लोषात मंगळागौरीचा जागर केला.

नवी मुंबई ः पारंपरिक दागिने आणि नऊवारीचा साज लेऊन मराठमोळ्या वातावरणात आपले वय विसरून आनंदाने नाचत, विविध खेळ व झिम्मा खेळत सकाळ मधुरांगणच्या महिलांनी बेलापूर येथील सकाळच्या कार्यालयात शनिवारी (ता.१०) जल्लोषात मंगळागौरीचा जागर केला. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे हरवलेल्या मंगळागौरीच्या आठवणी या वेळी महिलांनी सकाळ मधुरांगणसोबत पुन्हा जागवल्या. पुढच्या पिढीला मंगळागौरीचे महत्त्व समजावे, स्त्रियांना रोजच्या व्यस्त जीवनातून विरंगुळा मिळावा व आपले पारंपरिक खेळ जपले जावेत, यासाठी महिलांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘सकाळ मधुरांगण’ व माधवबागतर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले होते. 

नवी मुंबईतील विविध विभागांतील महाविद्यालयीन तरुणी, नववधू तसेच वयाची सत्तरी गाठलेल्या आज्जीही प्रचंड ऊर्जा व उत्साहात या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक गाण्यांसोबतच नवीन चालींच्या व्हायरल गाण्यांवर खेळ रचत, डमरू, लेझीम, तबला व ढोलाच्या तालावर योगासनांचे व फुगड्यांचे विविध प्रकार सादर करत व विविध सामाजिक संदेश देत स्पर्धकांनी परीक्षकांची व उपस्थितांची मने जिंकली. फुगड्यांचे ३० हून अधिक प्रकार सादर करत झाडे लावा, झाडे जगवा; स्त्री भ्रृण हत्या, कचऱ्याची विल्हेवाट, प्लास्टिकचा वापर टाळा, मुलींचं शिक्षण, प्राणी दया, चिनी वस्तूंचा वापर टाळा, शेतकरी कर्जमुक्त होऊ दे, राज्यातला पूर कमी होऊ दे; अशा विविध विषयांवर खेळांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ‘सासू तुझा सुनेवर भरोसा नाही काय’, ‘पोरी शिक ग पोरी, शिकायचं लय भारी’, ‘टिकटिक वाजते डोक्‍यात’ आदी गाण्यांमध्ये सद्यस्थिती गुंफत स्पर्धकांनी केलेले सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकले.

या स्पर्धेत ऐरोलीतील रुचिरा ग्रुपने पहिले पारितोषिक पटकावले; तर वाशी येथील स्वामींनी मंगळागौर ग्रुपला द्वितीय व जुना पनवेल येथील सखी मंगळागौर ग्रुपला तृतीय पारितोषिक मिळाले. माऊली मंगळागौर ग्रुप, निर्भया मैत्रिणी मंगळागौर ग्रुप व प्रगती मंगळागौर ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी अभिनेते रोहित नाईक व कौशिकी अकॅडमीच्या संस्थापिका प्रांजली देसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. धनश्री गंधे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या वेळी माधवबागच्या मीडिया व्यवस्थापक मंगला लोखंडे उपस्थित होत्या.

या वेळी माधवबाग मल्टिडिसिप्लिनरी कार्डियाक केअर क्‍लिनिक्‍स ॲण्ड हॉस्पिटल्स्‌च्या डॉ. स्मिता झांबरे यांनी महिलांनी कुटुंबासोबतच स्वतःची काळजी घ्यावी, असे सांगत हृदयरोग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी व तो कसा टाळावा; याबाबत खेळीमेळीच्या वातावरणात माहिती दिली. सिरीयलमधील सर्वांची काळजी घेणारी स्त्री आपल्याला आपली रोल मॉडेल वाटते व त्यातून स्वतःला त्रास करून घेत आजार अंगावर काढण्याची वृत्ती वाढते, जी चुकीची आहे; असे सांगत आपल्या वयापेक्षा आपले हृदय तरुण असेल तर ते सगळ्यांनाच आकर्षित करेल असा कानमंत्रही त्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangalagore's in Belapur is in full swing