तुमच्या ताटात येऊ शकतो रसायनाने पिकविलेला आंबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यभरातील 90 टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्यामुळे अन्न आणि औषधांची तपासणी पुढील दीड महिना ठप्प होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा रसायनाने पिकविलेला आंबाही तुमच्या ताटात येऊ शकतो.

मुंबई - अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यभरातील 90 टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्यामुळे अन्न आणि औषधांची तपासणी पुढील दीड महिना ठप्प होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा रसायनाने पिकविलेला आंबाही तुमच्या ताटात येऊ शकतो.

एफडीएच्या मुख्यालयातील 87 पैकी केवळ 28 कर्मचारी कामासाठी उपलब्ध आहेत. सहआयुक्त (अन्न) विभागातील 11, सहआयुक्त (औषध) विभागातील एक, 25 सुरक्षा अधिकारी, सात औषध निरीक्षक, पाच वर्ग कर्मचारी अशा एकूण 49 कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शाखांमधील उर्वरित 10 टक्के कर्मचारी पुढील दोन महिने कार्यालयात बसूनच काम करतील.

परिणामी आंब्याची तपासणी, पार्सल पोहचविणाऱ्यांना परवाने देणे आणि अन्य महत्त्वाची कामे रखडणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या अनुपलब्धतेमुळे वांद्रे येथील एफडीएच्या मुख्य कार्यालयातील कामे खोळंबली असून, राज्यभरातील उन्हाळी मोहीम ठप्प झाली आहे.

अधिकाऱ्यांनी अद्याप आंब्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेले नाहीत. "डिलिव्हरी बॉईज'ना प्रशिक्षण आणि कामाचा परवाना देण्याचे कामही लांबणीवर पडले आहे. एकूण 4000 पंचतारांकित उपाहारगृहांपैकी 3500 आस्थापनांची तपासणी झाली. मात्र, फेरतपासणी झालेली नाही. औषध दुकानांना परवाना देणे, छापे टाकणे अशी कामेही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंद राहतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

Web Title: Mango Chemical FDA