ठाण्यात कांदळवनाची कत्तल

ठाण्यात कांदळवनाची कत्तल

ठाणे  : ठाणे शहरामध्ये होऊ घातलेल्या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट (खाडीकिनारा विकसित) या प्रकल्पाच्या नावाखाली खारफुटीची (कांदळवन) बेसुमार कत्तल सुरू आहे. शहरातील खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनाचा पट्टा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकल्पासाठी ठाणे पूर्व तसेच, पश्‍चिमेकडील खाडी परिसरात खारफुटीवर मातीचा भराव टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असून कांदळवनाचा हरितपट्टा नष्ट होत असल्याची तक्रार बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेकडून ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे करण्यात 
आली आहे.

या प्रकल्पामध्ये खाडी किनाऱ्याच्या सुशोभीकरणाचा समावेश आहे. शहरातील पूर्वेकडील कोपरी, पश्‍चिमेकडील साकेत, बाळकुम, खारेगाव, कावेसर, कासारवडवली, गायमुख, रेतीबंदर, दिवा, वाघबीळ आणि मुंब्रा आदी परिसरातील खाडीकिनारी हा प्रकल्प सुरू आहे. यामध्ये बाळकूम, साकेत परिसरामध्ये जेसीबी आणि पोकलेन मशिन्सच्या सहायाने कांदळवनावर जेसीबी आणि पोकलेनच्या साह्याने मातीचा भराव टाकण्याचा प्रकार सुरू आहे. आतापर्यंत हजारो ब्रास माती खाडी किनारी असलेल्या कांदळवनावर टाकली गेली आहे. या कामाबाबत बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेने आक्षेप घेतला आहे. सीआरझेडची मान्यता न घेता हे काम सुरू असल्याचा दावा ग्रामस्थांनी 
केला आहे.

काय आहे वॉटरफ्रंट प्रकल्प?  
ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत राबविला जात असलेला हा प्रकल्प २२४ कोटींचा असून या प्रकल्पाअंतर्गत खारेगाव, साकेत, बाळकुम, कोलशेत, गायमुख, मोघरपाडा, कासारवडवली, कावेसार, रेतीबंदर, मुंब्रा आणि दिवा आदी खाडीचा विकास करण्यात येणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिला टप्पा हा महसुली उत्पन्नाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने विकसित करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात खासगी लोकसहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका आणि वित्तीय संस्थेकडून आर्थिक सहाय्य घेवून प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com