नवी मुंबईच्या "तटबंदी'वर हल्ले!

अर्चना राणे बागवान
रविवार, 21 जुलै 2019

खारफुटी, पाणथळीवरील आक्रमणाचा शहरापुढे धोका

मुंबई : खारफुटीची जंगले आणि पाणथळ जागा ही नवी मुंबईची "तटबंदी'. विकासाच्या नावावर सातत्याने तिच्यावर हल्ले होत असतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने येथील "संरक्षित पाणथळ'ही संकटात सापडली आहे. 

नवी मुंबईत शिरणारे भरतीचे पाणी अडवणारी ही नैसर्गिक यंत्रणाच अशा प्रकारे तथाकथित विकासाच्या नावाखाली नष्ट करण्यात येत असल्यामुळे भविष्यात या शहराला मोठ्या प्रमाणावर पूरस्थितीचा सामना करावा लागेल, अशी भीती नगररचना आणि पर्यावरण या क्षेत्रातील नामवंत व्यक्त करीत आहेत.

नेरूळ येथील एनआरआय इस्टेट परिसरातील पाणथळ जमिनीवर गोल्फ मैदान आणि बहुमजली निवासी संकुल उभारण्याचा घाट सिडकोने घातला आहे. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने गतवर्षी मज्जाव केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 19) त्या निर्णयास स्थगिती दिली. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून काळजीचा सूर उमटू लागला आहे.

नेरूळ, सेक्‍टर 60 च्या परिसरात 33.55 हेक्‍टर जागेवर गोल्फचे मैदान उभारण्यात येणार आहे; मात्र त्यातील 34 हेक्‍टर जागा "नॅशनल वेटलॅंड्‌स इन्व्हेन्टरी अटलांटा ऍटलास'चा भाग आहे.

सर्वोच्च न्यायालयानेच ऑक्‍टोबर 2017 मध्ये ती संरक्षित पाणथळ म्हणून जाहीर केली होती. या प्रकल्पामुळे ती बुजवली जाणार आहे.
वाशी खाडीलगत असलेली पाणथळ व पामबीच रस्त्याला लागून असलेल्या टीएस चाणक्‍य, तळावेव्यतिरिक्त नवी मुंबईत आता पाणथळ जागाच राहिलेली नाही.

वाशी खाडीलगत असलेल्या पाणथळ आणि खारफुटीवर मोठ्या प्रमाणावर भराव होत आहे. भविष्यात पावसाळ्यात किंवा मोठ्या भरतीच्या वेळी कधी पूरसदृशस्थिती उद्‌भवली, तर नवी मुंबईत शिरणारे पाणी अडवण्याचे काम या पाणथळीच्या आणि तिवरांच्या माध्यमातूनच होऊ शकते.  ती बचावफळी फोडणे हे संकटाला आमंत्रण देणेच आहे. त्याची झलक जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसातही नवी मुंबईतील सखल भागात साचलेल्या पाण्यात दिसली, याकडे पर्यावरण क्षेत्रातील जाणकार लक्ष वेधत आहेत.

चालढकल कोणाच्या फायद्यासाठी?
राज्य सरकारने 2015 मध्ये महामुंबई क्षेत्रातील माहुल शिवडी क्षेत्र, नवी मुंबईतील टीएस चाणक्‍य ते एनआरआय कॉम्प्लेक्‍सजवळील तळावे व पाणजे (उरण) येथील पक्षी अभयारण्यास मंजुरी दिली होती; मात्र अजूनही याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. राज्य सरकारमार्फत होणारी चालढकल ही सिडको प्रशासन आणि संबंधित व्यावसायिकाचे हित जपण्यासाठीच केली जात असावी, असा संशयही पर्यावरणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

...तर उठू शकते स्थगिती
गोल्फ मैदान आणि निवासी संकुलासाठीची जागा सर्वोच्च न्यायालयानेच ऑक्‍टोबर 2017 मध्ये संरक्षित पाणथळ म्हणून जाहीर केली होती. ही बाब पुन्हा एकदा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यास ही स्थगिती हटविण्यात येईल, असा विश्वास याबाबत उच्च न्यायालयातील याचिकाकर्ते सुनील अगरवाल व्यक्त करतात.

नवी मुंबईला भविष्यात पूरसदृश स्थितीचा होणारा धोका लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेनेही पामबीचलगतच्या पाणथळ जागेत भराव टाकण्यास वा कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास मनाई केली आहे. सिडको प्रशासनाने व्यावसायिक हित साधण्यासाठी पाणथळीचे क्षेत्र कमी दाखवणे, एसएझेडअंतर्गत आणणे यांसारखे काहीही केले तरी निसर्ग स्वतःचे मूळ रूप बदलणार नाही. भरतीदरम्यान येणारा पाण्याचा वेगवान प्रवाह थोपवण्यास आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यास पाणथळ शिल्लक नसेल, तर नवी मुंबईला नैसर्गिक आपत्तीपासून वाचवणे शक्‍य नाही.
- दत्ता घंगाळे,
पर्यावरण कार्यकर्ते

नवी मुंबईत टीएस चाणक्‍य आणि तळावे सोडल्यास पाणथळ शिल्लक आहेच कुठे? येथे गोल्फ मैदान उभारण्याचा सिडकोचा हट्ट त्यांच्याच दुसऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे म्हणजेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अस्तित्व धोक्‍यात आणण्याचे काम करत आहे.
- डेबी गोएंका,
कन्झर्व्हेशन ऍक्‍शन ट्रस्ट

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mangroves cutting