रस्त्यात मृत्यूचे सापळे

रस्त्यात मृत्यूचे सापळे

मुंबई - गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात लोअर परळमधील मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला जाग आली. पालिकेने मॅनहोलला संरक्षक जाळ्या बसवण्याची सुरुवात केली; परंतु आता रस्त्यातील उघडे चेंबरही जीवघणे ठरत आहेत. चेंबूरमध्ये शुक्रवारी (ता. २२) उघड्या चेंबरमध्ये पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यापूर्वी मानखुर्दमध्ये गटारावरील चेंबरमध्ये पडून एका लहानग्याचा मृत्यू झाला होता. उघड्या चेंबरची डोकेदुखी कशी दूर करायची, असा प्रश्‍न आता पालिकेला पडला आहे.

भूमिगत सुविधांसाठी वारंवार खोदकाम करायला लागू नये म्हणून महापालिकेने रस्ते आणि पदपथांवर डक्‍ट तयार करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ठराविक अंतरावर चेंबर बसवले जातात; मात्र ते सिमेंटचे असल्याने वाहतुकीमुळे तुटतात. पर्जन्यवाहिन्या साफ करण्यासाठी चेंबर बसवले होते. फायबरचे असल्याने ते लवकर खराब होतात आणि सहज हलवताही येतात. अशाच चेंबरमध्ये पडून मानखुर्दमध्ये काही दिवसांपूर्वी लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी चेंबूरमध्येही एका तरुणाला चेंबरमध्ये पडून जीव गमवावा लागला. 

केवळ १२०० मॅनहोल सुरक्षित 
डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूनंतर पालिकेने मॅनहोलला लोखंडी जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सुमारे एक लाख मॅनहोल आहेत. त्यातील १४५० मॅनहोलमध्ये पावसाळ्यापूर्वी संरक्षक जाळी बसवण्यात येणार होती. मात्र त्यातील अवघ्या १२०० मॅनहोलला जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. सखल भागातील ज्या ठिकाणी पाणी साचण्याची भीती आहे, अशा ठिकाणी जाळ्या बसवण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.गटराच्या उघड्या चेंबरबाबतही महापालिकेने लक्ष द्यायला हवे, असे मत माजी नगरसेवक कमलाकर नाईक यांनी व्यक्त केले.

अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
गटारात पडल्याने दिनेश जाठोलिया याचा मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत्यूप्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com