मतदारांकडूनच जाहीरनामा प्रसिद्ध

श्रीकांत सावंत - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

ठाणे - निवडणुकांच्या काळात सगळ्याच राजकीय पक्षांकडून मतदारांना खुश करण्यासाठी जाहीरनामा, वचननामा, आश्वासनपत्राद्वारे ‘पुढील काळात आम्ही काय करू’ हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी नागरिकांची मतेसुद्धा घेतली जातात; मात्र अनेक वेळा त्यामध्ये कल्पनाविलास जास्त असतो. अशक्‍यप्राय कामे पूर्ण करण्याची आश्वासने दिलेली असतात. त्यामुळे असे वचननामे किंवा जाहीरनाम्यापासून सामान्यांच्या आयुष्यात कोणताही फरक पडत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन ठाण्यातील ‘ठाणे सिटीझन फाऊंडेशन फोरम’ संस्थेच्या वतीने नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.

ठाणे - निवडणुकांच्या काळात सगळ्याच राजकीय पक्षांकडून मतदारांना खुश करण्यासाठी जाहीरनामा, वचननामा, आश्वासनपत्राद्वारे ‘पुढील काळात आम्ही काय करू’ हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी नागरिकांची मतेसुद्धा घेतली जातात; मात्र अनेक वेळा त्यामध्ये कल्पनाविलास जास्त असतो. अशक्‍यप्राय कामे पूर्ण करण्याची आश्वासने दिलेली असतात. त्यामुळे असे वचननामे किंवा जाहीरनाम्यापासून सामान्यांच्या आयुष्यात कोणताही फरक पडत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन ठाण्यातील ‘ठाणे सिटीझन फाऊंडेशन फोरम’ संस्थेच्या वतीने नागरिकांचा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची अवास्तव मागणी या घोषणापत्रामध्ये केली नसून सामान्य नागरिकांच्या हक्काच्या बाबी प्राधान्याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

ठाणे शहरातील सुमारे शंभरहून अधिक गृहसंकुलातील नागरिकांचा यात सहभाग असून घोडबंदर परिसरातील उच्च आणि उच्च मध्यमवर्गीयांचा संस्थेमध्ये मोठा भरणा आहे. त्यांच्या २५ मागण्या यात असून त्या राजकीय पक्षांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. निवडून येणाऱ्यांकडून ही कामे करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे या संस्थेकडून सांगण्यात आले आहे. 

शहरातील नागरिकांनी मांडलेल्या या जाहीरनाम्यात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरू केलेली कामे पूर्ण होईपर्यंत त्यांना त्यांच्या पदावर कायम ठेवावे, या मुख्य मागणीने जाहीरनाम्याची सुरुवात केली आहे. शहरातील नगरसेवकांचा नागरिकांशी सुसंवाद कमी होत असल्यामुळे नगरसेवकांनी प्रभागात वारंवार भेटी देऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत. नगरसेवकांचे नाव आणि नंबर प्रत्येक चौकात, प्रभागामध्ये उपलब्ध करून देण्याचा या जाहीरनाम्यात उल्लेख केला आहे. मैदाने, उद्यानांना आणि हरितपट्ट्यांना विशेष महत्त्व या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. राखीव जागा मोकळ्या करा, हरितपट्टे तयार करा, मोकळ्या मैदानांवरील लग्न-समारंभ, कार्यक्रम आणि रॅल्या बंद करा आणि नवीन कला-क्रीडा केंद्रे उभारण्याची विनंती यात करण्यात आली आहे. शहराची टोलमुक्ती, कचरा आणि मलनिःसारणाचा प्रश्न, पाणीपुरवठ्याचा प्रश्न, त्यासाठी आवश्‍यक स्वतंत्र धरणाची मागणी या नागरिकांनी केली आहे. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र झोन उभारा, असे या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. व्यापक पार्किंग योजना, सिग्नल यंत्रणा आणि शहरातील सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा करण्याच्या मागणीचा यात समावेश आहे. पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील सोनसाखळी चोरांवर कारवाईसाठी यंत्रणा उभारण्याची मागणी पालिकेकडूनही केली आहे. शाळांबाहेरील पार्किंग नागरिकांची डोकेदुखी ठरत असल्याचे त्यात नमूद केले आहे. शहरातील रस्त्यांवर पार्किंग करणाऱ्यांवर जबरदस्त दंड ठोठावण्याची विनंतीही या मंडळींनी केली आहे. ठाणे खाडीकिनाऱ्यावरील खारफुटीची जंगले, येऊर आणि पारसिक डोंगरावरील वनसंपदा राखण्याची मागणी या जाहीरनाम्यात आहे. सरकारी रुग्णालयातील सर्व सुविधांच्या मागणीकडेसुद्धा या मंडळींनी लक्ष वेधले आहे. रखडलेल्या कामातील कळवा आणि कोपरी पुलाचे काम, सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे.  

ठाणे सिटीझन फोरमचा जाहीरनामा
 आयुक्तांना सुरू केलेली कामे पूर्ण होईपर्यंत पदावर कायम ठेवणे.
 झाडांची लागवड करून छोटे हरितपट्टे निर्माण करावेत. 
 मोकळ्या मैदांनावरील कार्यक्रमांना बंदी घालावी.
 कार्यक्रमांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण बंद करावे.
 खारफुटीची नासधूस करणाऱ्यांवर कारवाई करावी.
 प्लास्टिक पिशव्यांबाबत कठोर धोरण.

Web Title: manifesto from the voters