सहा महिला पोलिसांवर आरोप निश्‍चित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

मुंबई - भायखळा तुरुंगात कैदी मंजुळा शेट्ये हिला झालेली मारहाण आणि हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह सहा जणांविरोधात आरोप निश्‍चित केले आहेत.

मुंबई - भायखळा तुरुंगात कैदी मंजुळा शेट्ये हिला झालेली मारहाण आणि हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने तुरुंग अधीक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह सहा जणांविरोधात आरोप निश्‍चित केले आहेत.

भा.दं.वि.च्या कलम 302 नुसार हत्या, कलम 120-ब नुसार हत्येचा कट, कलम 201 नुसार पुरावा नाहीसा करणे आणि कलम 501 नुसार मरेपर्यंत मारहाण करणे, या गुन्ह्यांखाली हे आरोप निश्‍चित करण्यात आले आहेत.

पोखरकरसह बिंदू नाईकवडे, वसिमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणे या तुरुंग पोलिस कर्मचाऱ्यांनी हेतूपुरस्सर मंजुळाची हत्या केल्याचा आरोप आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

शेट्येचा खून झाला, असे गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेचे साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेता शेट्ये ही स्नानगृहात पडली नसून, तिचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते, असे आरोपपत्रात नमूद केले आहे.

गेल्या वर्षी 23 जूनच्या रात्री मंजुळा शेट्येला तुरुंगात अमानुष मारहाण करण्यात आली आणि यातच तिचा मृत्यू झाला. मारहाण करणाऱ्या महिला तुरुंग पोलिस अधिकाऱ्यांना याची पूर्ण कल्पना होती की, आपण जे कृत्य करतोय त्यामुळे एखादी गंभीर घटना घडू शकते. तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच मारहाण झाली, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

आरोपपत्राचे स्वरूप
- 990 पानांचे आरोपपत्र
- 182 साक्षीदारांचे जबाब; यापैकी 97 कैदी
- साक्षीदारांमध्ये शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा समावेश
- सीसीटीव्ही फुटेजही महत्त्वाचा पुरावा

Web Title: manjula shetye murder case six women police crime