शिवसेनेच्या या आमदाराभोवती वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह

मनाेहर भाेईर
मनाेहर भाेईर

नवी मुंबई : बेशिस्त वाहनचालकांमुळे उरण तालुक्‍यात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. प्रवाशांचा अनेक वेळा तीन-चार तास खोळंबा होतो. त्याचे तीव्र पडसाद तालुक्‍यात उमटत असून ही जीवघेणी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा उरण तालुक्‍यात रंगली आहे. तरुणाई तर भोईर यांच्याविरोधात आक्रोश करत आहे. 

जेएनपीटीसह अन्य तीन बंदरे आणि जगप्रसिद्ध उद्योग असलेल्या उरणमध्ये ट्रेलर आणि अन्य प्रकारची मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. त्यासाठी सक्षम रस्ते अजूनही तयार झाले नाहीत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. अवजड वाहनांखाली चिरडून गेल्या 10 वर्षांत 500 पेक्षा अधिक बळी गेले आहेत. यामध्ये तरुणांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर तालुक्‍यातील रहिवाशांच्या तीव्र भावना आहेत. अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आंदोलने केली. त्यानंतरही हा प्रश्‍न सुटला नाही. 

या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून तर या प्रश्‍नाने उग्र रूप धारण केले आहे. बेशिस्त ट्रेलर चालक आणि खराब रस्ते यामुळे रस्त्यांवर दररोज कोंडी होते. ती काही वेळा तर 10 तासही असते. त्यामुळे तरुणाईमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. 

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमधूून मोठ्या संख्येने तरुणाई हा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुढे आली आहे. ही तरुणाई लोकप्रतिनिधींच्या विशेषत: उरणचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आहे. अन्य रहिवासी आणि पक्षांचे नेतेही आमदार भोईर यांच्याविरोधात संताप व्यक्त करत असून भोईर हा प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरल्याचे मत व्यक्त करत आहेत. यासंदर्भात भोईर यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता होऊ शकला नाही. 

मनोहर भोईर हे उरण तालुक्‍याला मिळालेले अकार्यक्षम आमदार आहेत. सांगता येईल असा एकही प्रश्‍न त्यांनी पाच वर्षात सोडवलेला नाही. त्यांच्यामुळे तर जनतेला अखेर रस्त्यावर उतरावे लागले. 
- प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी 

शिवसेनेला मनोहर भोईर यांच्या रूपाने उरणमध्ये मिळालेले आमदारपद हे अपघाताने मिळालेले आहे. त्यांच्या पदाचा वापर ते लोकांचे प्रश्‍न सोडवण्यापेक्षा स्वतःच्या उद्योगासाठी करतात. त्यांना पाच वर्षांत उरणचे प्रश्‍न मांडायला जमलेले नाही. तशी त्यांच्याकडे तेवढी विद्वता आणि बुद्धिमत्ता नाही. 
- गोपाळ पाटील, अध्यक्ष, उरण उत्कर्ष समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com