नोटाबंदी समजली नाही तेच त्याविरुद्ध बोलतात!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 डिसेंबर 2016

मुंबई - नोटाबंदीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरलेली असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाची स्तुती केली आहे. नोटाबंदीची योजना समजली नाही ते त्यावर वक्तव्य करत आहेत, असा बॉम्बच त्यांनी शिवसेनेवर टाकला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच त्यांनी हे वक्तव्य करून शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

मनोहर जोशी लिखित "आयुष्य कसे जगावे?' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्या वेळी श्री. जोशी यांनी शिवसेनेला धक्काच दिला. पंतप्रधान मोदी चांगले काम करत असून ते स्वत: निर्णय घेत आहेत, अशा शब्दांत मोदींची स्तुती करताना त्यांनी नोटाबंदीचे समर्थन केले. नोटाबंदीच्या निर्णयाला 90-95 टक्के नागरिकांनी समर्थन दिले आहे. या योजनेमुळे देशात बदल घडेल, असे जोशी म्हणाले. दादरमध्येच काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून मनोहर जोशी यांनी धाडसी विधान केले होते. त्यावरून शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला होता. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या गेल्यामुळे त्यांना व्यासपीठावरून खाली उतरावे लागले होते. आता नोटाबंदीचे समर्थन करून त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. या समारंभाला बिहारचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, महापौर स्नेहल आंबेकर, परचुरे प्रकाशनचे नरेन परचुरे उपस्थित होते.

युतीसाठी दोघांना एकत्र आणले!
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना-भाजपची युती 25 वर्षे टिकली. आता युतीबाबत प्रश्‍न निर्माण केला जात आहे. युती टिकणार की नाही, असे वाटणाऱ्यांना उत्तर मिळावे म्हणून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणले, असे मनोहर जोशी यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Web Title: manohar joshi book publish