मनसेकडून महापौरांना अनोखी भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

महिलेचा हात पिरगळल्याबद्दल मनसे स्टाईलमध्ये जाब विचारत, "स्त्री-नीती' पुस्तक देऊन वर्तन सुधारण्याची केली मागणी 

मुंबई : महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांताक्रूझ येथील पटेलनगरमध्ये जाब विचारणाऱ्या एका महिलेचा हात पिरगळल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. महापौरांच्या या वर्तनाबद्दल सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित घटनेचा मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या अनोख्या मनसे स्टाईलमध्ये महापौरांना जाब विचारला.

या वेळी सर्व कार्यकर्त्यांनी गुरुवारी महापौर बंगल्यावर थेट धडक देत महापौरांनी वर्तनात सुधारणा करावी, असे निवेदन केले. या वेळी त्यांनी "शिवछत्रपतींची स्त्री-नीती' हे पुस्तकही त्यांना भेट दिले. यासोबतच मनसेकडून देण्यात आलेल्या निवेदनात ते प्राध्यापक असण्याची आठवण करून देण्यात आली. तसेच तुम्ही मुंबईचे महापौर या संविधानिक पदावर विराजमान आहात, असे असतानादेखील महिलेचा हात धरून पिरगळणे हे अशोभनीय आणि असमर्थनीय कृत्य आहे, अशा कडक शब्दात मनसेकडून त्यांची कानउघाडणी करण्यात आली आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा आदर केला जात होता. अशा अनेक घटना शिवकालीन इतिहासात आहेत. आपणसुद्धा त्याच मातीत आणि त्याच स्वराज्यात आहोत हे विसरून जाऊ नये, महिलांचा सन्मान आपण केला पाहिजे, असेदेखील या निवेदनात म्हटले आहे. 

जाहीर माफीची मागणी 
महापौर महाडेश्‍वर यांच्या वर्तवणुकीमुळे नीतिमूल्यांचा ऱ्हास झाल्याचे दिसून आले. शिवनीतीनुसार ते शिक्षेस पात्र आहेत. स्वतःच्या चुकीची भलामण करत मनसेवर कोणत्याही प्रकारचे आरोप करून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये. महापौरांनी जाहीरपणे माफी मागावी आणि स्वतःचे आत्मपरिक्षण करावे, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manse gifts mayor vishwanath mahadeshwar stri niti book