प्रसिद्ध संगीतकारांनी दिला यशाचा मंत्र

प्रसिद्ध संगीतकारांनी दिला यशाचा मंत्र

उरण : तुम्‍ही कोणत्‍याही समाजाचे असलात तरी तुमच्यामध्ये कष्‍ट घेण्याची तयारी आणि उपजत गुण असतील तर, कोणालाही यशापासून रोखता येणार नाही, असा विश्‍वास प्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांनी व्यक्‍त केला. उरण, भेंडखळ येथील आगरी साहित्‍य संमेलनाच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते.

उरणमधील कै. हिराबाई हरिभाऊ घरत साहित्यनगरी भेंडखळ येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात १८ व्या आगरी साहित्य संमेलनाला शनिवारी (ता. १८) दिमाखात सुरुवात झाली. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उरणमध्ये साहित्यिकांची मांदियाळी पाहायला मिळाली.

प्रथम ग्रंथदिंडी काढून उपस्थित आगरी साहित्यिकांनी ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. टाळ-मृदंगाच्या गजरात साहित्यिकांनी सायंकाळी ४ वाजता वारकरी रूप धारण करून संपूर्ण भेंडखळ गावात साहित्यक ग्रंथांची पालखीत मिरवणूक काढली. त्यानंतर नियोजित अध्यक्ष संगीतकार अच्युत ठाकूर, संमेलनाध्यक्ष साहित्यिक हरिभाऊ घरत, स्वागताध्यक्ष कवी प्रकाश ठाकूर, संस्थाध्यक्ष मोहन भोईर, कार्याध्यक्ष प्रा. चंद्रकांत मढवी, संमेलनप्रमुख पुंडलिक म्हात्रे आदी उपस्थित मान्यवरांनी संमेलनाचे उद्‌घाटन केले.

कार्यक्रमाच्या उद्‌घाटनानंतर ईशस्तवन, महाराष्ट्रगीत, मान्यवरांचे स्वागत, आगरी भूषण पुरस्कार, पुस्तक प्रकाशन सोहळा असे विविध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर निमंत्रित कवींच्या कविसंमेलनाने कार्यक्रमाला रंगत आणली. प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, ए. डी. पाटील, दमयंती भोईर, प्रकाश पाटील, दत्तात्रेय सैतावडेकर आदी २५ कवींनी कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी धनंजय गोंधळी 
यांनी भूषवले.

या वेळी संमेलनाचे उद्‌घाटक अच्युत ठाकूर यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपट गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्या वेळी बोलताना त्यांनी सांगितले, की कष्ट केले की माणूस कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो. या वेळी त्यांनी गायलेले आईचा महिमा सांगणाऱ्या गीताने नकळत उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com