अबब ! अवघ्या सात दिवसांत मंत्रालयातील 3 लाख उंदीरं मारली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

''मंत्रालयात विष आणण्यास परवानगी नाही. त्यामुळेच शेतकरी धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणले नव्हते. त्यांनी मंत्रालयात असलेले उंदीर मारण्याचे विष घेतले आणि प्राशन केले''

- एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते 

मुंबई : मंत्रालयात उंदीराची समस्या बिकट बनली आहे. असे असताना मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले. या कंपनीने मंत्रालयातील तब्बल 3 लाख उंदीर मारल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. त्यानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ माजला.

एकनाथ खडसे म्हणाले, "मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले, अशी माहिती माहितीच्या आधिकारात मिळाली. 6 महिन्यांत सर्व उंदरांचे निर्मूलन करण्याचे ठरले होते. मात्र, सात दिवसांतच सर्व उंदीर मारण्यात आल्याचे सांगण्यात आले. दिवसाला 45 हजार उंदीर मारल्याचे सांगितले. मात्र, या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Eknath khadse

या सर्व उंदरांना जाळले, दफन केले की आणखी काय केले हे स्पष्ट व्हायला हवे. त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवाना नव्हता.'' मंत्रालयात विष आणण्यास परवानगी नाही. त्यामुळेच शेतकरी धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणले नव्हते. त्यांनी मंत्रालयात असलेले उंदीर मारण्याचे विष घेतले आणि प्राशन केले, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला.

तसेच ते पुढे म्हणाले, "जर मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर असतील तर राज्यातील महामंडळांमध्ये किती उंदीर असतील. त्यांच्या निर्मूलनासाठी किती खर्च करावा लागेल. त्यामुळे मंत्रालयातील उंदीर निर्मूलन हा खूप मोठा गैरव्यवहार आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी करावी. मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी दहा मांजरी आणल्या असत्या तरी उंदीर मारण्याचे काम झाले असते, पण तसे केले नाही.'' त्यामुळे या मंत्रालयातील उंदरांचे नेमके काय झाले याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही खडसे यांनी विधानसभेत केली.

Web Title: Mantralaya 3 Lakh Rats have been kelled in 7 days says Eknath Khadse