चैत्यभूमीवर अवतरले स्वच्छतादूत

चैत्यभूमीवर अवतरले स्वच्छतादूत

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी मुंबईतील अनेक सामाजिक संघटनांनी चैत्यभूमी परिसरात साफसफाईसाठी पुढाकार घेतला. हजारो युवक स्वच्छतादूत बनून चैत्यभूमीवर अवतरले होते. चैत्यभूमी आमच्यासाठी पावन भूमी आहे. त्यामुळे ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपलीच असल्याचे तरुणांनी सांगितले.

बाबासाहेबांना अभिवादन करायला देशभरातून लाखोच्या संख्येने अनुयायी येत असतात. साहजिकच दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात चैत्यभूमीवर कचरा होतो. त्यामुळे आम्ही दर वर्षी चैत्यभूमी परिसरातील रस्त्यांवर पडलेला कचरा उचलण्याचा उपक्रम राबवतो. यंदाचे आमचे पाचवे वर्ष आहे, असे संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचे अमित कदम यांनी सांगितले.

संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानातील सदस्य मुंबईच्या विविध भागांतून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येतात. सुरुवातीला त्यांनी चैत्यभूमीवर सफाईचे काम सुरू केले. आपली वेगळी ओळख दिसावी म्हणून टी शर्ट छापण्यात आले. त्यानंतर अनेकांनी उपक्रमाची स्तुती केली. त्यामुळे मोजकेच सदस्य असलेल्या आमच्या ग्रुपमध्ये आता अडीच हजार स्वयंसेवक आहेत. शाळकरी मुले-मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार आदींचाही त्यात सहभाग आहे. शुक्रवारी सकाळी नऊच्या दरम्यान संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानातील सदस्यांनी एकत्र येत चैत्यभूमी परिसरातील ओला-सुका कचरा जमा केला. देशभरातून येणाऱ्या अनुयायींवर जेव्हा कचरा करण्याचे आरोप होतात तेव्हा वाईट वाटते. त्यामुळे आम्ही युवकांनी एकत्र येऊन स्वच्छता उपक्रम सुरू केला. उपक्रमामध्ये दिवसेंदिवस सदस्यांची नोंदणी वाढतच आहे. चैत्यभूमी आमच्यासाठी पावन भूमी आहे. तिच्या स्वच्छतेची जबाबदारी आपलीच आहे, असे अभियानाचे नीलेश कदम यांनी सांगितले. चैत्यभूमीवर साफसफाई करून बाबासाहेबांना वैचारिक मानवंदना देतो, असे सामाजिक कार्यकर्ते रूपेश रुके यांनी सांगितले.

गाव-खेड्यांतून माय-माऊल्यासुद्धा चैत्यभूमीवर येत असतात. मात्र, इथे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही सुविधा नसते. त्यासाठी आपणच आपला कचरा उचलायला पाहिजे असे वाटते. नोकरी सांभाळून सकाळी चैत्यभूमीवर येऊन साफसफाई करतो.
- अनुराधा नटराज स्वामी, सदस्या
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com