'विदेशातील कांदा विकू देणार नाही'

टीम ई-सकाळ
शनिवार, 7 डिसेंबर 2019

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं चालू हंगामातील कांदा पिकाचं नुकसान झालं. परिणामी बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवू लागला आणि दरांनी उच्चांक गाठला.

मुंबई : कांद्याच्या दरानं किरकोळ बाजारात दराचा उच्चांक गाठलाय. सरकारला हे दर आटोक्यात आणण्यात अपयश आलंय. चांगल्या प्रतीचा कांदा बाजारात 160 रुपये किलोपर्यंत गेलाय. त्यामुळं गृहिणींच्या बजेटबरोबरच हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. सरकारनं इजिप्त आणि तुर्कस्थानमधून कांदा आयात केलाय. पण, आयात कांद्याच्या विक्रीला विरोध होतोय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय आहे विरोधामागची भूमिका?
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळं चालू हंगामातील कांदा पिकाचं नुकसान झालं. परिणामी बाजारात कांद्याचा तुटवडा जाणवू लागला आणि दरांनी उच्चांक गाठला. कांद्याचा तुटवडा कमी करण्यासाठी इजिप्त आणि तुर्कस्थानमधून कांदा आयात करण्यात आलाय. पण, हा कांदा विकू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय. मराठा क्रांती मोर्चाने केंद्र सरकारच्या कांदा आयात धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळं शेतकरी आनंदात आहे.

Image may contain: 1 person, food

येत्या जानेवारी महिन्यात कांद्याचे पुढील पिक बाजारात येणार आहे. त्याच काळात जर विदेशी कांदा बाजारात आला तर, स्थानिक शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव कोण देणार?, असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चानं उपस्थित केलाय. त्यामुळं कांदा आयात ही शेतकऱ्यांसाठी घातक आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळंच कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आलाय. त्यामुळं विदेशातून आयात करण्यात आलेल्या कांद्याला मराठा क्रांती मोर्चानं विरोध करण्याचा निर्णय घेतलाय. 

आणखी वाचा - कांदा महागलाय; काय आहेत किचनमधील 'ऑप्शन्स'

आणखी वाचा - गावच कांदा-लसूण खात नाही; काय आहे कारण?

कोपर्डी प्रकरणी फाशी द्या अन्यथा...
हैदराबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघांना पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. देशभरातून त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या असल्या तरी, मराठा क्रांती मोर्चानं या एन्काऊंटरचं स्वागत केलंय. तसेच कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यानंतर त्याची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी करण्यात आलीय. जर, कोपर्डी प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर, उद्रेक होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिलाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maratha kranti morcha to oppose imported onion in maharashtra