झलक महामोर्चाची!

मुंबई - मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे रविवारी निघालेल्या मोटरसायकल फेरीत सहभागी झालेले तरुण-तरुणी.
मुंबई - मराठा क्रांती मूक मोर्चातर्फे रविवारी निघालेल्या मोटरसायकल फेरीत सहभागी झालेले तरुण-तरुणी.

मराठ्यांची भव्य मोटरसायकल फेरी 

मुंबई - विविध मागण्यांसाठी राज्यात ठिकठिकाणी निघत असलेल्या मराठा समाजाच्या मूक मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. ६) या समाजाने काढलेल्या जनजागृती मोटरसायकल फेरीला अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. देशाच्या आर्थिक राजधानीत महामोर्चा काढण्याबाबत चाचपणी करण्यासाठी मराठा मूक क्रांती मोर्चाच्या वतीने निघालेल्या या फेरीत या समाजाचे ३० हजारांहून अधिक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. हा महामोर्चा किती भव्य असेल, याची झलकच या शिस्तबद्ध व शांततेत निघालेल्या मोर्चाने दिल्याचे बोलले जाते. या फेरीमुळे या समाजाच्या मागण्यांचा रेटा आणखी वाढला असून, सरकारवरील दबावात भर पडल्याचे निरीक्षणही राजकीय विश्‍लेषकांनी नोंदवले आहे.

सायन येथील सोमय्या मैदानावर सकाळी १० च्या सुमारास मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी मोर्चाच्या अग्रस्थानी असलेल्या महिलांच्या मोटरसायकलींना झेंडा दाखवून शुभेच्छा दिल्यानंतर फेरी सुरू झाली. छत्रपती शिवाजी टर्मिनससमोरील आझाद मैदानावर दुपारी १२ वाजता फेरी पोहोचली आणि तेथून माघारी फिरली. भायखळा येथे तिची सांगता झाली.  प्रत्येक टप्प्यावर या फेरीत मोटरसायकलस्वार सहभागी होत होते. तरुण-तरुणींचा भरणा असलेल्या हजारो मोटरसायकलस्वारांच्या लांबच लांब रांगा सर्वांच्या नजरा खिळवून ठेवत होत्या. या फेरीच्या मार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

सरकारचे चर्चेचे आवाहन
या फेरीची दखल सरकारलाही घ्यावी लागली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या फेरीची ‘शिस्तबद्ध व संयमी मोटरसायकल फेरी’ अशी प्रशंसा करत मराठा मोर्चाच्या आयोजकांना सरकारशी चर्चा करण्याचे आवाहन केले. मराठा समाजातील निवृत्त न्यायमूर्ती, ज्येष्ठ कायदेपंडित, घटनातज्ज्ञ आदींचा समावेश असलेले शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास आले, तर त्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक कशी करता येईल, याची सविस्तर चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com