#MarathaKrantiMorcha मुंबई, नवी मुंबई, रायगड आज बंद

#MarathaKrantiMorcha  मुंबई, नवी मुंबई, रायगड आज बंद

मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून आंदोलनात बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहण्यात आली. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी दक्षता घेण्याचे आवाहनही समन्वयकांनी केले. दरम्यान, मंगळवारी राज्यभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले.

राज्यभरात मंगळवारी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे तीव्र पडसाद मुंबईतही उमटले. आंदोलनकर्त्यांना समर्थन म्हणून चेंबूर येथे सकाळी मराठा समाजाच्या महिला कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला; मात्र काही तासांत त्यांची समजूत काढत पोलिस प्रशासनाने वाहतूक सुरळीत केली. मुंबईच्या बंदला समर्थन देण्यासाठी कल्याण आणि ठाण्यातही उद्या बंद पुकारण्यात आला आहे. बंदमधून शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत नेमकी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलनादरम्यान कानडगाव (ता. गंगापूर) येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या हाकेला मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वत्र कडकडीत बंद पाळून शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यासह मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. ‘बंद’ला ठिकठिकाणी हिंसक वळण लागले. रास्ता रोको, मोर्चे काढीत प्रचंड घोषणाबाजी झाली. एसटी बस फोडण्यासह पोलिसांची वाहने टार्गेट करण्यात आली. घनसावंगी (जि. जालना) येथे पोलिस ठाण्यासह झालेल्या दगडफेकीत नऊ पोलिस जखमी झाले. काकासाहेबवर अंत्यसंस्कार सुरू असताना वेगवेगळ्या घटनांत सात जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.

आरक्षण अन्य मागण्यांसाठी परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा निघाल्यानंतर मराठवाड्यात वेगवेगळी आंदोलने सुरू आहेत. कायगाव (ता. गंगापूर) येथे ठिय्या धरलेल्या आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. संतप्त झालेल्या आंदोलकांपैकी काकासाहेब शिंदे (वय २८) याने काल गोदावरीवरील पुलावरून उडी घेत आत्महत्या केली. त्यामुळे क्षोभ आणखी वाढला. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी, समाजाचा संयम संपला असून, आरक्षणाचा तत्काळ निर्णय घ्यावा, यासह काकासाहेबशी संबंधित काही मागण्या करीत समन्वयकांनी आज महाराष्ट्र बंद ची हाक दिली. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला.

मराठा आंदोलनात...
    जिल्हावार अहवाल देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश
    पुण्यातून औरंगाबादच्या ४४ एसटी फेऱ्या रद्द
    राज्यात १८२ बस फोडल्या; ४९ लाखांचे नुकसान
    विदर्भात ‘बंद’ला अल्प प्रतिसाद
    अकोल्यात ठिय्या, बुलडाण्यात शाळा बंद
    वाशीममध्ये बंद, कोल्हापुरात रात्रभर ठिय्या
    कोकण व नाशिकमध्ये संमिश्र प्रतिसाद
    सोलापुरात शाळा बंद, खानदेशात ‘रास्ता रोको’
     नगर जिल्ह्यात ‘चक्का-जाम’, बस पेटवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com