#MarathaKrantiMorcha जाळपोळ आणि रास्ता रोकोमुळे नाहक त्रास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

नवी मुंबई - मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला नवी मुंबईत हिंसक वळण लागून आंदोलनाला गालबोट लागले. या बंददरम्यान, जमावाने ठिकठिकाणी वाहनांवर दगडफेक, जाळपोळ आणि रेल्वे रोको करून नागरिकांना वेठीस धरून दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली.

या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे बस व रेल्वेने प्रवास करणारे नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागला.

नवी मुंबई - मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला नवी मुंबईत हिंसक वळण लागून आंदोलनाला गालबोट लागले. या बंददरम्यान, जमावाने ठिकठिकाणी वाहनांवर दगडफेक, जाळपोळ आणि रेल्वे रोको करून नागरिकांना वेठीस धरून दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली.

या वेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे बस व रेल्वेने प्रवास करणारे नागरिक, महिला आणि शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागला.

मराठा समाजाचे प्राबल्य असलेल्या घणसोली व कोपरखैरणे येथे मराठा समाज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर उतरला होता. या वेळी जमावाने कोपरखैरणेतील वाशी-कोपरखैरणे मार्गावरील डीमार्ट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी बेस्टच्या दोन बसवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या. त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथे भर रस्त्यावर वाहनांचे टायर जाळण्याचे प्रकारदेखील आंदोलकांनी केले. वाशी, सीबीडी, तुर्भे भागांत रस्त्यांवर वाहने अडवून चाकातील हवा काढून टाकण्याच्या घटनादेखील घडल्या. 

पोलिसांवर दगडफेक 
नितीन कंपनी भागात आंदोलकांनी दगडफेक केली. या दगडफेकीत दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर संध्याकाळपर्यंत २० जणांना ताब्यात घेतल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. तसेच या आंदोलनामध्ये समाजकंटक असल्याचेही ते म्हणाले. दुपारी मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर नितीन पुलाच्या दिशेने बसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी उठण्यास सांगितले. तीन तास आंदोलक पूर्व द्रुतगती महामार्ग अडवून धरत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यात काही समाजकंटक असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

आंदोलनकर्त्यांवर गुन्हे
वाशीमध्ये आंदोलनकर्त्यांनी सेक्‍टर-९, सेक्‍टर-२ आणि सेक्‍टर-१७ भागांमध्ये दुकानांवर दगडफेक करून त्यांचे नुकसान केले. आंदोलनकर्त्यांनी वाशी डेपोमध्ये एनएमएमटी, बेस्ट बसेसवर दगडफेक करून नुकसान केले. त्यामुळे वाशी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.

डहाणूत प्रतिसाद नाही 
डहाणू (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यात वाणगाव, चिंचणी येथील जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वाणगाव, चिंचणी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती; मात्र डहाणू, कासा, बोर्डी येथे बंदला प्रतिसाद न मिळाल्याने बाजरपेठा आणि वाहतूक सुरू होती. पालघरमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आवाहन केलेल्या या बंदला रिक्षाचालक व मालक संघटना, व्यापारी वर्ग व स्थानिक रहिवाशांनी प्रतिसाद देत बंद पार पाडला.

२७ टीएमटींचे नुकसान
या आंदोलनामुळे झालेल्या हिंसाचारात टीएमटीचे तब्‍बल आठ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. टीएमटीच्या२७ बसगाड्यांचे नुकसान झाले. यात काही गाड्यांच्या काचांचा अांदोलकांनी चक्काचूर केला. महापालिकेची टीएमटी सेवा दुपारी एक वाजता आंदोलकांच्या पवित्र्यामुळे बंद करावी लागली. दुपारी पावणेदोनच्या सुमारास आंदोलकांचा जथ्था टीएमटी बसचा पाठलाग करीत आल्याने सॅटीसवरील वाहतूकही बंद करावी लागली.

Web Title: #MarathaKrantiMorcha mumbai band rasta roko