#MarathaKrantiMorcha नवी मुंबई कडकडीत बंद! 

#MarathaKrantiMorcha नवी मुंबई कडकडीत बंद! 

नवी मुंबई -  सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी (ता. 25) पुकारण्यात आलेल्या "नवी मुंबई बंद'ला बेलापूर, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा भागात चांगला प्रतिसाद मिळाला. येथील दुकाने आणि बाजारपेठा सकाळपासूनच बंद होत्या. त्यामुळे शहरात कडकडीत बंद पाळला. शहरात अनेक ठिकाणी शांततेत सुरू असलेल्या या बंदला कोपरखैरणेत हिंसाचाराचे गालबोट लागले. येथे आंदोलकांनी दगडफेक करून डी-मार्ट चौकात दुचाकी जाळली. वाशीतही काही वाहनांच्या काचा फोडल्या. आंदोलकांच्या तुलनेत तोकडे मनुष्यबळ असल्याने पोलिसही हतबल झाले होते. 

नवी मुंबईत सकाळपासूनच आंदोलक हातात झेंडे घेऊन रस्त्यावरून फिरताना दुकाने बंद करण्याचे आवाहन दुकानदारांना करत होते. त्यामुळे सकाळपासूनच बाजारात शुकशुकाट होता. वाशीपासून बेलापूरपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोलीत आंदोलक रस्त्यावर उतरून रिक्षा व इतर वाहनचालकांना वाहने थांबवण्यास सांगत होते. कोपरखैरणे डी-मार्ट परिसरात सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली होती. चौकातून जाणाऱ्या वाहनांना आंदोलकांनी लक्ष केले. त्यात एक दुचाकी अडवून तिला आग लावली. त्यामुळे कोपरखैरणेतून घणसोली आणि वाशीकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक सायंकाळपर्यंत बंद होती. कोपरखैरणेत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली. पाम बीच मार्गावर पोलिसांनी सानपाडा मोराज सर्कलपर्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता; परंतु सानपाड्यापासून पुढे आंदोलकांनी वाहने रस्त्यात आडवी उभी करून वाहतूक रोखली होती. वाशीत सेक्‍टर 17 सारस्वत बॅंकेसमोरील भुयारी मार्गही आंदोलकांनी रोखला होता. त्यामुळे पाम बीच मार्गावरून येणाऱ्या वाहनांना वाट मिळत नसल्याने येथे वाहतूक कोंडी झाली होती. 

शाळा सोडल्या 
सकाळपासून आंदोलनाच्या बातम्या येण्यास सुरुवात झाल्यामुळे सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा दुपारी सोडण्यात आल्या. काही पालकांना याची माहिती नसल्यामुळे आणि आंदोलन सुरू असल्याने मुलांना घरी आणताना कसरत करावी लागली. त्यानंतर दुपारच्या सत्रात खासगी शाळा भरल्या नाहीत. 

प्रवाशांचे हाल 
ट्रान्स हार्बर मार्गावर कोपरखैरणे आणि घणसोली रेल्वेस्थानकांमध्ये आंदोलकांनी "रेल रोको' करून लोकल अडवून धरली होती. त्यामुळे ट्रान्स हार्बरवरील लोकल सेवा सुमारे तीन तास विस्कळित झाली होती. लोकल बंद झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा शोध घेतला. परंतु रिक्षा आणि बसही बंद असल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. यामुळे कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. काही जणांनी तर शेवटी पायपीट करत घर गाठणे पसंत केले. परंतु जे लांबून आले होते त्यांना बस आणि रिक्षा मिळत नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली. 

वाहनांची नासधूस 
पाम बीच मार्गाहून वाशीकडे जाण्यासाठी इनऑर्बिट मॉलच्या पाठीमागील रस्त्यावरील सारस्वत बॅंकेच्या शेजारील भुयारी मार्गाजवळ आंदोलकांनी रस्ता बंद केला होता. यातून वाट काढत पुढे जाणाऱ्या कारचा दुचाकीस्वारांनी पाठलाग करून इनऑर्बिट मॉलच्या मागे तिची काच फोडली. वाशी आणि कोपरखैरणे डी-मार्ट चौकातही काही वाहनचालकांना धक्काबुक्की झाली. 

जमावाला पांगवण्यासाठी आश्रुधुराचा वापर 
कोपरखैरणेत डी-मार्ट परिसरात जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक झाल्याने आणि आंदोलन स्थगित केल्याची घोषणा मुंबईत मराठा आंदोलकांच्या नेत्यांनी केली असतानाही आंदोलक मागे हटत नसल्याने कोपरखैरणेत आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर येथील जमाव पांगला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com