#MarathaKrantiMorcha शाळांनाही बंदचा फटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध शहरांत बंद पाळण्यात आला. या बंदचे पडसाद मुंबई महानगर क्षेत्रात उमटले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही; परंतु राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या लेखी फेरपरीक्षा सुरळीत पार पडल्या. तर काही शाळांतील विद्यार्थी अडकून पडले होते.

शहर आणि उपनगरांत बंद पाळण्यात येणार असल्याने अनेक पालकांनी मुलांना शाळेत सोडले नाही. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित होते. सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये जवळपास ४० ते ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती; परंतु ९ वाजल्यापासून बंद तीव्र होऊ लागल्याने दुपारच्या सत्रातील शाळांना याचा फटका बसला. स्कूल बस रस्त्यावर न आल्याने पालकांनीही मुलांना शाळेत सोडले नाही. जाळपोळीच्या घटनांमुळे शहर आणि उपनगरांतील दुपारच्या सत्रातील सुमारे ८० टक्के शाळा बंद ठेवण्यात आल्या. बंदचा शाळांना फटका बसला असला तरी महाविद्यालये नियमितपणे सुरू होती.

दरम्यान, मुंबई विद्यापीठांतर्गत येणारी सर्व महाविद्यालये आणि त्यांचा कारभार सुरळीत सुरू होता. त्यासोबत विद्यापीठ प्रशासनाची फोर्ट आणि कलिना येथील संकुलातील कामकाजही सुरळीत सुरू होते, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.

विद्यार्थ्यांची उपस्थिती...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांत बुधवारी सकाळच्या सत्रात दहावी-बारावी आणि दुपारच्या सत्रात बारावीच्या एका पेपरची लेखी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये सकाळच्या सत्रात दहावी बीजगणित या विषयाची परीक्षा होती. त्याला ७१ हजार ७६२ तर बारावी अर्थशास्त्र पेपरला २३ हजार १०५ विद्यार्थी बसले, तर दुपारच्या सत्रात दहावीच्या सामान्य गणित या विषयाची परीक्षा होती. त्याला ६ हजार ७८३ विद्यार्थी बसले होते. सर्व विभागीय मंडळात दोन्ही सत्रांतील परीक्षा सुरळीत पार पडल्याचे, शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.

Web Title: #MarathaKrantiMorcha schools closed