आठ बांगलादेशींना मुंबईतून अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

मुंबई - दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कांदिवली परिसरात केलेल्या कारवाईत आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यातील दोघांकडे पॅनकार्डही सापडले आहेत. सर्व आरोपींविरोधात परदेशी नागरिक कायदा, पासपोर्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी 18 ते 22 वयोगटातील आहेत. ते इलेक्‍ट्रिशन म्हणून काम करीत होते. त्या सर्वांची 31 मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या आरोपींचा दहशतवादी संघटनांशी संबंध आहे का, याबाबत "एटीएस' तपास करत आहे. यापूर्वी नालासोपारा, पुणे आणि नवी मुंबई येथून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. पुण्यात अटक केलेले पाच बांगलादेशी नागरिक हे अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अन्सारुल्लाह बांग्ला टीमच्या (एबीटी) सदस्यांना आश्रय देत असल्याचे उघड झाले होते. यातील मुख्य आरोपी राज मंडल याच्यासह इतर आरोपी पुण्यातील संरक्षणस्थळाच्या बांधकामावर काम करीत होते.
Web Title: marathi mumbai news 8 bangladesh people arrested