चौपाटीवर रंगदालन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - मराठी रंगभूमीचा वैभवशाली इतिहास मांडणारे वैशिष्ट्यपूर्ण दालन मुंबई महापालिकेतर्फे गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रात उभारले जाईल; तसेच अंधेरीतील पालिकेच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात मुंबईबाहेरील नाट्यकलावंतांच्या राहण्याची सोय केली जाईल, अशी घोषणा  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. मराठी नाटकांसाठी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिराचे भाडे कमी करण्याबाबत प्रयत्न केले जातील, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.   

९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या समारोप सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. १७५ वर्षांच्या मराठी रंगभूमीचे वैभव वाढवण्यासाठी, रंगभूमीसाठी चांगले काम करणाऱ्यांच्या मागे, नाट्यक्षेत्रामागे मराठी माणसाची ताकद उभी करू, असे आश्‍वासनही ठाकरे यांनी या वेळी दिले.  

नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ते समाजाला आरसा दाखवण्याचे काम करते. हे काम रंगभूमीने वेळोवेळी केले आहे. हा समर्थ आणि वैभवशाली रंगभूमीचा इतिहास मांडणारे, दाखवणारे दालनही बिर्ला क्रीडा केंद्रात पालिकेतर्फे उभारले जाईल, असे ते म्हणाले. वाघ्यामुरळी, नंदीबैल, कडकलक्ष्मी, वासुदेव हे लोककलाकार मुंबईतून जवळपास लुप्त होत आहेत. यांच्यासाठी पालिकेकडून शक्‍य होईल ते करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.

मुंबईबाहेरून येणाऱ्या कलावंतांसाठी मुंबईत राहण्याची व्यवस्था हवी, अशी मागणी नाट्य संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांनी केली होती. त्याचा संदर्भ देत शहाजीराजे क्रीडासंकुलात कलाकारांनी हक्काने यावे आणि या सुविधेचा उपयोग मराठी नाट्यक्षेत्राच्या वाढीसाठी करावा, असे ठाकरे  म्हणाले.  

वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिरचे भाडे ७५ हजार असल्याने तेथे मराठी नाटके होत नाहीत, अशी चिठ्ठी निवेदक सुबोध भावे यांनी त्यांच्या भाषणापूर्वी वाचून दाखवली होती. त्यावर यासाठी जे शक्‍य आहे ते केल्याशिवाय मी राहणार नाही, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

बालगंधर्वांचे काम करणाऱ्यानेच हे सांगितल्याने आपण हे करणारच, असेही त्यांनी हसतहसत सांगितले. 

सत्तेत असू नसू...
ठाकरे यांच्या पाठिंब्यावर पुढील सांस्कृतिकमंत्री मीच असेन, अशी भावना विनोद तावडे यांनी भाषणात व्यक्त केली होती. तो संदर्भ घेत ठाकरे म्हणाले, विनोदजी, सत्तेत असू नसू; पण रंगभूमीच्या मागे मराठी माणसाची ताकद आपण उभी करू !

Web Title: marathi natya sammelan uddhav thackeray