प्रचंड गर्दीचे अखंड 60 तास!

कृष्ण जोशी
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - 98 वे मराठी नाट्यसंमेलन साठ तास अखंड सुरू ठेवण्याच्या विक्रमी प्रयोगातील एखादा कार्यक्रम वगळता रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजक व कलाकार आनंदून गेले आहेत. विशेष म्हणजे मध्यरात्री तसेच पहाटे तीन वाजता झालेल्या कार्यक्रमालाही दर्दी रसिकांनी दणकून उपस्थिती लावल्याने या संदर्भातील शंका-कुशंकांनाही पूर्णविराम मिळाला.

मुंबई - 98 वे मराठी नाट्यसंमेलन साठ तास अखंड सुरू ठेवण्याच्या विक्रमी प्रयोगातील एखादा कार्यक्रम वगळता रसिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजक व कलाकार आनंदून गेले आहेत. विशेष म्हणजे मध्यरात्री तसेच पहाटे तीन वाजता झालेल्या कार्यक्रमालाही दर्दी रसिकांनी दणकून उपस्थिती लावल्याने या संदर्भातील शंका-कुशंकांनाही पूर्णविराम मिळाला.

मुंबईत विविध सणांच्या दिवशी पहाटे सहा वाजता होणाऱ्या प्रातःस्वर कार्यक्रमांना स्थानिक रसिक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतातच. त्यानुसार नाट्यसंमेलनातही पहाटे सहा वाजताच्या कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आकर्षक व भपकेबाज नाट्यदिंडी, उद्‌घाटन सोहळा, समारोप सोहळा यांनाही रसिकांचा तुडुंब प्रतिसाद अपेक्षितच होता; पण मध्यरात्रीनंतर पहाटे साडेबारा व साडेतीनच्या कार्यक्रमांना रसिक थांबतील का, अशी शंका उपस्थित झाली होती. महाविद्यालयीन तरुणाईसह सर्वच स्तरांतील रसिकांनी या कार्यक्रमांना हजेरी तर लावलीच; पण कलाकारांच्या अदाकारीला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांना सुखावून टाकले.

पहिल्या रात्री "संगीत सौभद्र' नाटकाला पांढरपेशा पद्धतीने प्रतिसाद देणाऱ्या रसिकांनी त्यानंतर झालेल्या पंचरंगी पठ्ठेबापूराव, रंगबाजी, संगीतबारी या मुख्यतः तमाशाप्रधान कार्यक्रमांनाही अस्सल गावरान पद्धतीने ठसक्‍यात प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी पहाटे झालेले मराठवाड्यातील आराधी लोकनृत्य, विदर्भातील झाडेपट्टी नाट्यप्रकार, भंडाऱ्याच्या कलाकारांचा महिषासुरवध; त्यानंतर कोकणी दशावतार आणि नमन या प्रयोगांनाही प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. कोकणातील "गावातील बालवाडीचे उद्‌घाटन' हे विनोदी नाट्यही रसिकांना तुफान हसवून गेले. सुकन्या कुलकर्णी आदी नामवंत अभिनेत्यांनी हा सर्व कार्यक्रम पहाटेपर्यंत थांबून पाहिला.

लावण्यांचा जाळ
पहिल्या दिवशी मुख्यतः सिनेमात शोभाव्यात अशा लावण्या ऐकल्यानंतर दुसऱ्या रात्री काळी बिल्ली प्रॉडक्‍शनच्या संगीत बारीमधे खऱ्याखुऱ्या छोट्या थेटरातले किंवा खासगी बैठकीतले तमाशे, लावण्या कशा असतात, याचा आँखो देखा हाल पाहायला मिळाला. अर्थात, या अनुभवालाही लोकांनी डोक्‍यावर घेतले.

Web Title: marathi natyasammelan