नेरूळमधील गांधी विद्यालयाला हादरा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

बेलापूर  - नेरूळ सेक्‍टर ८ मधील महात्मा गांधी मिशन शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. याची तक्रार केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडे (सीबीएसई) गेल्यामुळे मंडळाने या शाळेची मान्यता काढून घेतली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्‍यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, याच्या विरोधात शाळा न्यायालयात दाद मागणार आहे.

बेलापूर  - नेरूळ सेक्‍टर ८ मधील महात्मा गांधी मिशन शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. याची तक्रार केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडे (सीबीएसई) गेल्यामुळे मंडळाने या शाळेची मान्यता काढून घेतली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्‍यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाने यावर तोडगा काढावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, याच्या विरोधात शाळा न्यायालयात दाद मागणार आहे.

महात्मा गांधी मिशन शाळेतील सातवीच्या विद्यार्थिनीला धमकावून इंग्रजीच्या शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप २०१६ मध्ये मुलीच्या पालकांनी केला होता. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. मुलीच्या पालकांनी २८ सप्टेंबर २०१६ ला नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर शिक्षक फरार झाला होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते. 

या प्रकारची माहिती इतर पालकांना मिळताच ७ डिसेंबर २०१६ रोजी पालकांनी मुख्याध्यापिका गुलाठी यांना घेराव घातला होता. नंतर दुसऱ्या दिवशी पालक आणि राजकीय पक्षांनी शाळेसमोर आंदोलन केले होते. मुख्याध्यापिका असे प्रकार झाकत असून शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप करीत मुख्याध्यापिकेला अटक करण्याची मागणी त्या वेळी पालकांनी केली होती. या प्रकरणातील शिक्षकाला पकडण्यात विलंब होत असल्याने सहायक पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांना निलंबित केले होते. 

शाळेत घडलेल्या या प्रकरणाची तक्रार केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाकडे (सीबीएसई) गेल्याने या शाळेच्या सीबीएसई बोर्डाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. 

३० वर्षांपासून सुरू असलेल्या या शाळेत मराठी आणि इंग्रजी (सीबीएसई) माध्यमाचे पहिली ते १२ वी पर्यंतचे सुमारे ९८५ विद्यार्थी शिकत आहेत. मान्यता रद्द करताना विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये यासाठी महिनाभरात होणाऱ्या वार्षिक परीक्षा सीबीएसई बोर्ड घेणार आहे. यावर्षी नववीतून दहावीत जाणाऱ्या तसेच आकारावीतून बारावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्ष सीबीएसई बोर्ड सुरू राहणार असल्याची माहिती शाळेने पालकांना दिली. 

पालकही न्यायालयात जाणार 
मान्यता रद्द झाल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सीबीएसईच्या या निर्णयाविरोधात शाळा व्यवस्थापनाने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती त्यांनी पालक सभेत दिली होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पालकांनाही बरोबर घ्यावे, अशी मागणी पालक करीत आहेत.

शाळा बंद झाल्याची अफवा
सीबीएसईची मान्यता रद्द करण्यात आली असल्याची माहिती शाळा प्रशासनाने पालकांना सभा घेऊन दिल्यावर शाळाच बंद होणार असल्याची अफवा पालकांमध्ये पसरली असल्याने इतर शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी काही पालकांनी धावाधाव सुरू केली आहे. त्यासाठी सीबीएसई बोर्डाच्या शाळांचे उंबरठे ते झिजवत आहेत.

शिक्षण अधिकाऱ्यांना साकडे 
शाळेची सीबीएसई बोर्डाची मान्यता रद्द करणे हे शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून पालिकेचे शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी या प्रकरणात विद्यार्थी, पालक आणि शाळेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सुरज पाटील, प्रभाग अध्यक्ष गणेश रसाळ, युवक तालुका सचिव लक्ष्मण सणस यांनी केली आहे.

Web Title: marathi news belapur Mahatma Gandhi Mission School CBSE