उपचार लांबले, भाषेअभावी की सक्षम यंत्रणेअभावी? 

भिल्ल समाजाचा10 वर्षाचा रविता
भिल्ल समाजाचा10 वर्षाचा रविता

मुंबई : ती झाडावरुन पडली त्याला एक महिना होत आला. तीन चार रुग्णालयांनी तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. मुंबईच्या रस्त्यावर मुलीला उचलून फिरणाऱ्या राज्या वळवी खडक्या (नंदूरबार) या अत्यंत मागास गावातून आलेल्या बापाला मुलीला रुग्णालयात आणण्यात यश तर आलंय पण महिनाभरापासून तिच्यावर उपचार झाले नाहीत. हा भाषेचा अडसर की यंत्रणांचा अभाव असा प्रश्न रविता आणि तिच्या बापाची उपचारांसाठी झालेली वणवण पाहताना पडतो.   

गावातील जंगलात वळवी कुटुंबातील रविता वळवी (10 वर्षे) ही झाडावरुन पडल्याचं निमित्त झालं. रविता वळवी (10 वर्षे) ही 29 सप्टेंबरला झाडावरुन पडली. उपचार मिळावेत म्हणून बापाने पाच किलोमीटर अंतरावर बांबूच्या खाटेवर घालून रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर खासगी गाडीतून ग्रामिण रुग्णलयात नेलं. रविताला झालेल्या जखमांवर उपचार करण्यासाठी तिथे कोणतीच सुविधा नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासण्या करुन तिला जिल्हा रुग्णालयात न्यायला सांगितलं. बापाने पुन्हा वाहनाची जुळवाजुळव करुन नंदूरबार रुग्णालयात नेलं.

दोन-तीन दिवसानंतर डॉक्टरांनी इथे उपचार होणार नाहीत असं सांगत हात वर केले. तेव्हा राज्या यांनी मुलीला शहाद्याच्या खासगी रुग्णालयात नेलं. तिथे पैसे असेल तोवर ठेवून मग त्यांना मुंबईला जा असं सुचवलं. तेव्हा राज्या रविता आणि तिची आई शांतीबाई यांना खासगी गाडीत घालून  मुंबईला के.ई.एम. रुग्णालयात आणले. दोन-तीन दिवस रविता रुग्णालयात के.ई.एम. रुग्णालयात दाखल होती. राज्या यांना तिथे सांगितलेला खर्च त्यांना परवडणारा नव्हता. भाषा येत नाही, खिशात पैसे नाहीत, रुग्णालयात नेमकं काय करावं हे कळत नाही अशा मनस्थितीत  मुलीला उचलून ते गावी निघाले होते. भटकत गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोहचले. तेव्हा पोलिसांनी अडवून चौकशी केली. भाषेच्या अडचणीमुळे पोलिसांना काही समजेना. राज्याच्या आधार कार्डावर असलेल्या गावाच्या नावावरुन पोलिसांना त्यांचं गाव कळलं. नंदूरबारच्या एका महिला पोलिसांच्या मदतीने त्यांच्याशी संवाद साधण्यात यश आलं. सगळी कहाणी कळल्यावर पोलिसांनी मदत करुन त्यांना रुग्णालयात दाखल करायला लावलं. 

मिळालेल्या माहितीनुसार रविताच्या पाठीला आणि कमरेखाली अनेक जखमा आहेत. ती अॅनिमिक असल्यामुळे आणि अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया केलेली नाही. रविता मुंबईच्या गोकळूदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालयाच्या बालरोग विभागात दाखल आहे. हात मजूरी करणाऱ्या राज्याला सरकारी रुग्णालयातील खर्चही परवडणारा नाही. त्यांच्याकडचे सर्व पैसे संपले आहेत. रुग्णालयात मिळणाऱ्या कुपनवर राज्या आणि शांतीबाई जेवण करतात. मात्र त्यांना भाषा येत नसल्याने कोणाशी बोलून मदत मिळवणंही त्यांना शक्य होत नाही.

15 ऑक्टोबरपासून मुंबईत आलेल्या आणि दोन-तीन दिवस बोलता न आल्यामुळे मुंबईच्या रस्त्यावर फिरणाऱ्या रविताच्या आई-बापाला मदतही मागता येत नाही. हॉस्पिटल ते हॉस्पिटल फिरणाऱ्या रविताला आज रुग्णालयात खाट मिळालीय पण उपचार मिळेल या प्रतिक्षेत तिचे आई-बाप आणि स्वतः रविता आहे.
वळवी कुटूंबाकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांना शोधणंही कार्यकर्त्यांना कठीण जात आहे. नर्मदा बचाव आंदोलनच्या लतिका राजपूत या कार्यकर्तीने दिलेल्या माहितीनुसार आदिवासी भागातून असे अनेक जण उपचारांसाठी गावातून बाहेर जावं लागतं. खडक्या ग्रामिण रुग्णालयात आवश्यक सुविधा नाहीत. जिल्हा रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, एक्सरे सीटी स्कॅन मशीन अशी यंत्रणा नाही. तेव्हा उपचार होणं शक्य नाही. शिवसेनेने काही महिन्यांपूर्वी फिरती वैद्यकीय सेवा उपलबद्ध करुन दिली. पण ती गरज असलेल्या दुर्गम भागात पोहोचतच नाही असा आरोप लतिकाने केला आहे. 

इथल्या डॉक्टरांना स्थानिकांची भाषा येत नाही काही ठिकाणी डॉक्टरच नाहीत. मुंबईशिवाय या रुग्णांना पर्याय नाही. मुंबईत आल्यावर तिथली यंत्रणा, तिथली भाषा यामुळे अनेकदा रुग्ण उपचार न घेताच परततो. 

वळवी कुटुंबाला मदतीची गरज 
भिल्ल समाजाचे असल्याने रुग्णालयातील अन्न त्यांच्या सवयीचं नाही. शांतीबाई सांगते मिळणारं अन्न रवितालाच होत मग नवरा-बायको पाणी पिऊन झोपून जातात. मुलीला उपचार मिळावेत म्हणून मुंबई तर गाठली पण खिशात दमडी नाही तेव्हा उपचार कसे मिळतील या चिंतेत रविताचा बाप आहे. रविताला उपचारांसाठी मदत हवी आहे. वळवी कुटूंबाशी संवाद साधण्यासाठी ओरसिंग पटले या त्यांच्या गावच्या माणसाची सकाळने फोनवरुन मदत घेतली. तेव्हा वळवी कुटूंबशी संवाद साधता आला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com