'दाऊद टोळी सोडल्यावर माझ्यावर खोटे गुन्हे'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

मुंबई - मी दाऊदच्या टोळीत असताना माझ्याविरोधात एकही गुन्हा नव्हता, मात्र दाऊद टोळी सोडल्यावर दाऊद, पोलिस आणि राजकारण्यांनी माझ्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवायला सुरवात केली, असा खळबळजनक दावा गॅंगस्टर छोटा राजनने पत्रकार ज्योर्तिमय ऊर्फ जे. डे. हत्या खटल्यात सोमवारी केला. 

मुंबई - मी दाऊदच्या टोळीत असताना माझ्याविरोधात एकही गुन्हा नव्हता, मात्र दाऊद टोळी सोडल्यावर दाऊद, पोलिस आणि राजकारण्यांनी माझ्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवायला सुरवात केली, असा खळबळजनक दावा गॅंगस्टर छोटा राजनने पत्रकार ज्योर्तिमय ऊर्फ जे. डे. हत्या खटल्यात सोमवारी केला. 

डे हत्येच्या खटल्याची सुनावणी विशेष मोका न्या. एस. एस. आडकर यांच्यापुढे सुरू आहे. आज राजनची जबानी कलम 313 अंतर्गत दिल्लीतील तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदविण्यात आली. डे हत्याकांडामध्ये माझा सहभाग नाही, त्यांचे लेख किंवा बातम्यांवरून मी त्यांची हत्या घडवून आणली नाही, असाही दावा त्याने जबाबात केला. मी 1993 पर्यंत दाऊदच्या टोळीत होतो. तोपर्यंत माझ्याविरोधात एकही फिर्याद नोंदविण्यात आली नव्हती. मात्र 1993 मध्ये मुंबईत बॉंबस्फोट झाल्यावर दाऊदशी फारकत घेतल्यावर मी त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती गुप्तचर विभागाला दिली होती. त्यानंतर पोलिस, राजकारणी आणि दाऊदच्या साथीदारांनी माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करून मला अडकविले, असा दावाही राजनने केला. 

डेच्या लेखामुळे बदनामी झाली, म्हणून मी त्याची हत्या केल्याचेही सपशेल खोटे आहे, असे त्याने सांगितले. मग तुझे नाव साक्षीदार का घेतात, असा सवाल न्यायालयाने त्याला केला. त्यावर, साक्षीदार पोलिसांच्या सांगण्यावरून अशी जबानी देत आहेत, असे तो म्हणाला. दाऊदच्या सांगण्यावरून मला अनेक खोट्या प्रकरणांत अडकविण्यात आले. त्यांची मला माहितीही नाही. अनेक चकमकींच्या प्रकरणातही माझ्याविरोधात गुन्हे नोंदविले; पण मी त्यातील लोकांना ओळखतही नाही, असाही दावा त्याने केला. पत्रकार जे. डे. यांची हत्या जून 2011 मध्ये पवईत भरदिवसा करण्यात आली होती. डे यांच्या गुन्हेगारीवरील वृत्तांमुळे नाराज होऊन राजनने त्यांची हत्या घडवून आणली, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. या खटल्यातील अंतिम युक्तिवादाला बुधवारपासून (ता. 31) सुरवात होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: marathi news Chhota Rajan Dawood Ibrahim J Dey Murder case