डोंबिवलीकर पुन्हा निराधार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

डोंबिवली - डोंबिवलीमध्ये कायमस्वरूपी आधार कार्ड केंद्र नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. या पार्श्‍वभूमीवर अवघ्या काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कायमस्वरूपी आधार कार्ड केंद्राचे उद्‌घाटन झाले होते. सामाजिक कार्यकर्ता आणि आधार कार्ड केंद्राचा चालक यांच्या वादामुळे अखेर गुरुवारी (ता.१५) हे आधार कार्ड केंद्र बंद झाल्यामुळे नागरिक पुन्हा एकदा निराधार झाले आहेत. 

आधार कार्ड काढण्यासाठी लागणारे टोकन घेण्यासाठी नागरिकांना राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात जावे लागत असल्याने याबाबत सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. ही पोस्ट व्हायरल झाल्यामुळे राज्यमंत्री कार्यालयातून टोकन देणे बंद करण्यात आले. त्यामुळे वैतागलेल्या केंद्रचालकाने हे केंद्र बंद करण्याची भूमिका घेतली आहे. इतकेच नाही; तर आधार कार्डसाठीचे टोकन सामाजिक कार्यकर्ते निंबाळकर यांच्याकडून घ्यावे, अशी सूचना केंद्राबाहेर लावण्यात आली आहे. त्यामुळे टोकन घेण्यासाठी नागरिक निंबाळकर यांच्याकडे जाऊ लागल्यामुळे निंबाळकर वैतागले आणि त्यांनी याबाबत आधार कार्ड केंद्रात जाऊन केंद्रचालक डोंगरे यांना जाब विचारला. त्यामुळे बुधवारी केंद्रात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर या वादातून गुरुवारी केंद्रचालकाने या केंद्राला टाळे ठोकले. 

अवघ्या  २० दिवसांत टाळे
शहरामध्ये नवीन आधार कार्ड काढण्यासह त्यामध्ये काही दुरुस्तीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील देना बॅंकेत एकमेव आधार कार्ड केंद्र असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. यावर उपाय म्हणून राज्यमंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेत एका खासगी एजन्सीच्या मदतीने मोठ्या दणक्‍यात आधार कार्ड केंद्राचे उद्‌घाटन केले होते; मात्र हे केंद्र सुरू होऊन अवघ्या २० दिवसांचा कालावधी उलटला असून अल्पावधीत केंद्राला टाळे लागल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

आधार कार्ड केंद्र सुरू झालेल्या दिवसापासून रोज प्रचंड गर्दी होत असल्यामुळे काम करणे कठीण झाले होते. टोकनवरून नागरिकांमध्ये कायम शाब्दिक चकमक होत होती. हा वाद आणि त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ थांबवण्यासाठी राज्यमंत्री कार्यालयातून टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. लवकरच हे केंद्र पुन्हा सुरू होणार असून पालिकेच्या कर्मचाऱ्यातर्फे टोकन देण्याबाबत बोलणे सुरू आहे.
- कैलास डोंगरे, आधार कार्ड केंद्रचालक तथा भाजप पदाधिकारी  

केंद्र सुरू करण्यात आल्यावर आम्ही त्याचे स्वागतच केले होते; मात्र टोकन देण्याची व्यवस्था ही आधार कार्ड केंद्रातच असणे गरजेचे असताना ते राज्यमंत्री कार्यालयातून घ्यावे, असे सांगण्यात आल्यामुळे नागरिकांची पायपीट होत होती. या समस्येला वाचा फोडण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. यामुळे केंद्र बंद करण्याचे निमित्त मिळाले आहे. 
- महेश निंबाळकर, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: marathi news dombivli aadhar card