हरितपट्ट्यासाठी सुबाभुळांचा बळी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

तुर्भे - वाशीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या चौपाटीलगत ९० झाडांची कत्तल करून तब्बल आठ हजार ४२० झाडे लावण्याचा घाट नवी मुंबई पालिकेने घातला आहे. अमृत योजनेअंतर्गत यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. पण यासाठी पूर्ण वाढ झालेल्या सुबाभुळांचा बळी दिला जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये याबाबत नाराजी आहे.

तुर्भे - वाशीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या चौपाटीलगत ९० झाडांची कत्तल करून तब्बल आठ हजार ४२० झाडे लावण्याचा घाट नवी मुंबई पालिकेने घातला आहे. अमृत योजनेअंतर्गत यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. पण यासाठी पूर्ण वाढ झालेल्या सुबाभुळांचा बळी दिला जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये याबाबत नाराजी आहे.

पारिजातकाचा सडा, आवळ्याची चव, पिंपळ वृक्षाची छाया, वडाच्या पारंब्या, उंबराच्या कल्पवृक्षाखाली रंगलेले अध्यात्म, रुद्राक्षाच्या माळा, चाफा बोलणारा, राज्याचे राज्यपुष्प ताम्हाण अशा झाडांच्या सावलीत आपण उभे असल्याचा भास नवी मुंबईकरांना लवकरच होणार आहे. कारण नवी मुंबई पालिका अमृत योजनेअंतर्गत वाशीतील मिनी चौपाटीलगत असलेल्या नारायण कला केंद्राजवळील खाडीकिनारी हरितपट्टा तयार करणार आहे. यासाठी या भागातील ९० झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यात ८८ देशी आणि दोन ऑस्ट्रेलियन सुबाभुळांचादेखील समावेश आहे.

अधिकाऱ्यांची सारवासारव  
यापूर्वी घणसोलीतदेखील अशाच पद्धतीने हरितपट्टा विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयांचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांनतर आता वाशीच्या मिनी चौपाटीवरील नारायण कला केंद्रजवळील खाडीकिनारी असलेली २६८ झाडे तोडण्यात येणार असल्याचे यापूर्वी पालिकेने म्हटले होते. पण या विरोधात काही सामाजिक संस्था आणि जागृत नागरिकांनी आवाज उठविल्यावर अधिकाऱ्यांनी प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे कारण देत ९० झाडांची कत्तल करण्यासाठी तातडीने हरकती, सूचना मागविणारी जाहिरात प्रकाशित केली. तसेच तशा आशयाचे शुद्धिपत्रकदेखील प्रकाशित केले. 

सुबाभूळ असलेल्या ठिकाणी अन्य झाडे वाढत नसल्यामुळे ८८ देशी आणि दोन ऑस्ट्रेलियन सुबाभूळ तोडले जाणार आहेत. या जागेवर आवळा, वेल, पांजरा, पळस, लीला, अशोक, रुद्राक्ष, कैलासपती वड, पिंपळ, उंबर, कदंब, करंजा महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणून ओळखले जाणारे ताम्हाण चाफा, केनर पारिजात बिली या जातीचे तब्बल आठ हजार ४२० झाडे लावली जाणार आहेत.
- प्रकाश गिरी, उद्यान अधिकारी, वाशी.

मुळात झाडांची पूर्ण वाढ झालेली असताना दोन कोटी रुपये खर्च करून आठ हजार ४२० झाडे लावण्याचे प्रयोजन काय? मनपाने सांगितल्याप्रमाणे इतर वृक्षांचा अपवाद वगळता वड, पिंपळ, जांभुळ, पाव्हा ही झाडे यापूर्वीच या ठिकाणी लावलेली आहेत. त्यामुळे महापालिका उद्यान विभाग नागरिकांची दिशाभूल करीत आहे. 
- गणेश गायकवाड,  सदस्य, पर्यावरण सेवाभावी संस्था.

Web Title: marathi news environment turbhe