मुंबईकरांनी साजरी केली पर्यावरणपूरक होळी

मुंबईकरांनी साजरी केली पर्यावरणपूरक होळी

मुंबई - विविध संस्था-संघटनांनी केलेल्या पर्यावरपूरक होळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईत शुक्रवारी (ता. २) रंगांची मनसोक्त उधळण करण्यात आली. ‘होळी रे होळी’चा नारा देत गुरुवारी रात्री अनेक ठिकाणी होलिकोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच एकत्र येत रंगपंचमीचा आनंद लुटला. पर्यावरणविषयक जागृतीमुळे जवळजवळ सर्वच ठिकाणी फक्त रंगांनी अर्थातच कोरडी धुळवड साजरी केली. काही ठिकाणी मात्र सर्रास मद्याच्या पार्ट्या रंगलेल्या दिसत होत्या. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविण्याचे प्रकारही दिसून आले. 

वरळी, वेसावे, सायन आदी कोळीवाड्यांमध्ये बुधवारपासूनच (ता. २८) होळीची झिंग चढली होती. कोळीवाड्यांत बुधवारी कुमार होळी करण्यात आली. गुरुवारी पाटलांची मोठी होळी पेटविण्यात आली. वेसावे कोळीवाड्यात रस्तोरस्ती होळ्या करण्यात आल्या. वरळी कोळीवाड्यात तर गाण्यांचे लेझर शो आयोजित करून त्या तालावर तरुण-तरुणींनी ठेकाही धरला होता. पारंपरिक वेशभूषा परिधान करून कोळीबांधवांनी मनोभावे होलिकामातेची पूजा केली. पारंपरिक कोळी नृत्यांवर महिलांनी ठेका धरला.

पर्यावरणपूर्वक रंगपंचमीबाबत सातत्याने होत असलेल्या जनजागृतीचे काही वर्षांपासून सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. यंदाही अनेकांचा कोरड्या रंगांवर भर होता. रासायनिक रंग आणि पाण्याच्या अतिवापरासंदर्भात दर वर्षी होत असलेल्या जनजागृतीला यश येत आहे. कोरडी रंगपंचमी खेळून, मिष्टान्नापासून सामिष भोजनावर ताव मारत अनेकांनी रंगांची उधळण केली. आपल्या मित्र-मैत्रिणींना रंगवून त्याचे ‘सेल्फी’ काढून ते सोशल मीडियावर अपलोड करण्याची चढाओढ मुंबईकरांमध्ये दिसून आली.

डीजे, सेल्फी अन्‌ मटणावर ताव
शुक्रवार सकाळपासूनच धुळवडीचा जल्लोष सुरू झाला. ठिकठिकाणी रंगांची मनसोक्त उधळण सुरू होती. होळीच्या गाण्यांमध्ये मुंबईकर रंगून गेले होते. काही ठिकाणी डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. नैसर्गिक रंगांची एकमेकांवर उधळण करत मित्र-मैत्रिणी आणि आप्तांसोबत कुठे इमारतींच्या गच्चीवर, सोसायट्यांचा परिसर आणि गल्लीबोळात रंगपंचमी खेळण्यासाठी एकच चुरस लागली होती. विलेपार्ले, जुहू, मलबार हिल, महालक्ष्मी आदी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात फोम डान्स सुरू होते. रंगपंचमी शुक्रवारी आल्याने चिकन आणि मटन शॉप्सच्या दुकानांबाहेर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. रंगपंचमी खेळल्यानंतर अनेकांनी सामिषावर आडवा हात मारला. रंगांची उधळण सुरू असतानाही अनेक जण सेल्फी काढण्यात रंगले होते. रंगीबेरंगी चेहरे व्हॉट्‌सॲप आणि फेसबुकवर अपलोड करण्यासाठी तरुणाईमध्ये चढाओढ पाहायला मिळत होती. 

अाराेग्याच्या तक्रारी
नैसर्गिक रंगांचा वापर यंदा मोठ्या प्रमाणावर झाला असला, तरीही काही ठिकाणी त्याला गालबोट लागले. रासायनिक रंगांचा वापर झाल्याने अनेक जण अत्यवस्थ झाले. त्वचेची जळजळ, चक्कर येणे आदी तक्रारी घेऊन अनेक जण रुग्णालयांमध्ये दाखल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com