दीपा पवारचा लढा लक्षवेधी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

घर-संसाराचा गाडा ओढताना महिलेची होणारी ओढाताण ही कुणाच्याही लक्षात येत नाही. विशेष म्हणजे त्या या दु:खाचा- त्रासाचा कुठे उल्लेखही करत नाहीत. अनुभूती संस्थेच्या अध्यक्षा दीपा पवार यांनी त्यासाठीच महिलांच्या बाजूने नेटाने लढा उभारला आहे. महिलेच्या शरीरावर केवळ तिचाच अधिकार असावा म्हणूनही त्यांचा लढा सुरू आहे.

घर-संसाराचा गाडा ओढताना महिलेची होणारी ओढाताण ही कुणाच्याही लक्षात येत नाही. विशेष म्हणजे त्या या दु:खाचा- त्रासाचा कुठे उल्लेखही करत नाहीत. अनुभूती संस्थेच्या अध्यक्षा दीपा पवार यांनी त्यासाठीच महिलांच्या बाजूने नेटाने लढा उभारला आहे. महिलेच्या शरीरावर केवळ तिचाच अधिकार असावा म्हणूनही त्यांचा लढा सुरू आहे.

पाचसहा वर्षांपूर्वी राईट टू पी मोहिमेत स्वतःला झोकून दिलेल्या महिला कार्यकर्त्यांपैकी एक चेहरा होता दीपा पवार यांचा. महिलांना मुंबईत स्वच्छ, सुरक्षित आणि मोफत स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यासाठी दीपा यांचा महत्त्वाचा वाटा होता, परंतु त्या केवळ महिलांच्या स्वच्छतागृहाच्या हक्‍कापर्यंत थांबल्या नाहीत; तर त्यांनी महिलांच्या शरीराच्या अधिकाराविषयी, लैंगिक अधिकारांविषयीही लढा देण्याचे काम सुरू ठेवले होते.

दीपा यांचा विवाह स्वतःच्या मर्जीने झाला नव्हता, परंतु त्यांच्या जोडीदाराने त्यांच्यातील सामाजिक कार्याची चुणूक ओळखली. त्यांना साथही दिली. 

या कामात त्यांना कुटुंबियांचीही साथ लाभली. वाचा, ऊर्जा आदी संस्थांमध्ये त्यांनी काम केले.

दीपा या भटके विमुक्त समाजातील आहेत. हा समाज शिक्षणापासून कोसों दूर आहे. समाजातील महिलांची अवहेलना त्यांना पटत नव्हती. स्वतःचा अनुभवही कटू होता. त्यामुळे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या शरीराचा सन्मान करण्याचे शिक्षण आवश्‍यक आहे असे त्यांना वाटले. त्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू ठेवली.

दीपा या गाडिया लोहार समाजातील आहेत. या समाजाने अजूनही आर्थिक स्थैर्य पाहिलेले नाही. वाढती बेरोजगारी, व्यसनाधीनता आहे, या मुद्द्यांसह महिलांना नाकारलेली निर्णयक्षमता या विषयांवर त्या अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्या गाडिया लोहार समाजातील महिलांना शरीरसाक्षरतेचे धडे देत आहेत.

शरीरसाक्षरता झाली तर समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल, हा त्यांचा निर्धार दीपा पक्का करत आहे. ‘बदल हा मुंगीच्या वेगाने घडतो, पण बदल नक्कीच अमलात येतो,’ असे त्या म्हणतात.

Web Title: marathi news International Women Day deepa pawar mumbai