दागिने विकून उभारली शाळा!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

मालाड - केरळची राजधानी त्रिवेंद्रमहून लग्नानंतर मुंबईत कामाच्या शोधात आलेली एक तरुणी आज मालाड मालवणीच्या गरीब वस्तीत स्वतःच्या हिमतीवर एक शाळा चालवते आहे. गरिबांच्या मुलांना तिथे अल्प दरात दर्जेदार शिक्षण मिळते. लार्जी वर्गिस असे त्यांचे नाव असून त्यांनी जिद्दीने अनेक अडथळे पार करीत आज स्वतःची शाळा उभी केली आहे. शाळा सुरू करण्यासाठी पैशाचा प्रश्‍न निर्माण झाला तेव्हा त्यांनी आपले सारे दागदागिने आणि वडिलोपार्जित जागा विकून शाळेसाठी निधी जमवला. अवघ्या २५ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या शाळेत आज तब्बल दोन हजार मुले शिकत आहेत.

लार्जी वर्गिस यांनी सुरुवातीला शिक्षिका म्हणून मालवणीत खासगी शाळेत काम केले; परंतु गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रयत्न करूनही त्यांना यश मिळत नव्हते. गरीब मुले-मुली गटाराच्या बाजूला बसून वेळ घालवत बसलेली त्यांनी पाहिली. पालकांची आर्थिक स्थिती हलाखीची. निम्मे पालक नशेच्या आहारी गेलेले. त्यांना मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी लार्जी यांनी त्यांच्यासोबत काम करण्याची गरज ओळखून नोकरी सोडली. गरीब वस्तीचा विकास करायचा असेल तर तिथे शाळा सुरू करून मुलांना शिक्षणाची वाट दाखवायला हवी, असा विचार त्यांच्या मनात डोकावला. मात्र, तो अंमलात आणण्यासाठी पैशांची गरज होती. लार्जी यांचा निर्धार ठाम होता. कोणत्याही महिलेला सर्वात जास्त आवड असते ती दागिन्यांची. त्यांनी तेच विकले. वडिलोपार्जित जागाही विकली. जमलेल्या पैशातून मालवणीतील आझमीनगरसारख्या मागासलेल्या ठिकाणी अनेक अडचणींवर मात करीत २००४ मध्ये सेंट मेथिवस एज्युकेशन संस्थेच्या माध्यमातून सेंट मेथिवस इंग्लिश स्कूल सुरू केले. सुरुवातीला अवघ्या २५ विद्यार्थ्यांपासून सुरुवात केली. आज त्यांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. खेळाबाबतही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी उत्तम परीक्षक नेमून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शाळेचे नाव उंचावले. शाळा असलेल्या वस्तीतील निम्म्याहून अधिक कुटुंबे आर्थिक समस्यांनी ग्रासलेली आहेत. शाळेतील अनेक विद्यार्थी फीही भरू शकत नाहीत. तरीही त्यांना शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते. वस्तीतील बहुतांश पालक नशेच्या आहारी गेले आहेत. तुमच्या मुलांचे भविष्य शिक्षण घेतल्यानेच सुधारेल हे त्यांच्या मनात बिंबवण्यात लार्जी यशस्वी ठरल्या आणि त्याचाच त्यांना मोठा आनंद आहे.

अनेक पुरस्कारांनी सन्मान
आंतरराष्ट्रीय पातळीवर लार्जी वर्गिस यांनी मलेशियात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ब्रिटिश कौन्सिलकडून ‘इंटरनॅशनल स्कूल’ अवॉर्ड, रोटरी इंटरनॅशनल क्‍लबकडून ‘हिरो लिटरसी मिशन’ अवॉर्ड, इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा डायनॅमिक स्पोर्टर अवॉर्ड, रोटरी इंटरनॅशनल क्‍लबचा ‘बेस्ट टीचर अवॉर्ड’, इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा अवॉर्ड ऑफ एक्‍सलन्स आदी पुरस्कारांनी त्यांना गौरवले आहे. 

Web Title: marathi news International Women Day malad gold school