कल्याण - रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू

रविंद्र खरात 
बुधवार, 7 मार्च 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये प्रवासी वर्गाकडून वाढीव भाडे घेणे, दादागिरी करणे, बेकायदा रस्त्यावर रिक्षा पार्क करून वाहतूक कोंडी करणाऱ्या विरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू झाली असून कल्याण पश्चिम, डोंबिवली नंतर आज बुधवारी (ता. 7) कल्याण पूर्वमध्ये धडक कारवाईमुळे रिक्षा चालक आणि रिक्षा संघटनांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये प्रवासी वर्गाकडून वाढीव भाडे घेणे, दादागिरी करणे, बेकायदा रस्त्यावर रिक्षा पार्क करून वाहतूक कोंडी करणाऱ्या विरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू झाली असून कल्याण पश्चिम, डोंबिवली नंतर आज बुधवारी (ता. 7) कल्याण पूर्वमध्ये धडक कारवाईमुळे रिक्षा चालक आणि रिक्षा संघटनांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

कल्याण आणि डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात रिक्षाचालकांची वाढती दादागिरी मुळे सर्व सामान्य नागरीक त्रस्त झाले असुन त्यांच्या बेकायदा रस्त्यावर पार्क केल्याने वाहतूक कोंडी होत असल्याने सर्व सामान्य नागरीक आणि वाहन चालक त्रस्त झाले आहेत. या तक्रारी पाहता कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे. कल्याण पश्चिम, डोंबिवली पाठोपाठ कल्याण पूर्व मधील चक्की नाका, नेतवली नाका, काटेमानवली नाका परिसरात कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस एन जाधव आणि कल्याण आरटीओ विभागाचे मराठे, जोशी यांच्या पथकाने बेशिस्त रिक्षा चालका विरोधात कारवाई केली.

दिडशेहुन अधिक रिक्षा चालकांची तपासणी करत 44 रिक्षा चालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली. गणवेश न घालणे, रिक्षांची कागदपत्रे न ठेवणे, 16 वर्ष जुन्या रिक्षा वापरणे, बेकायदा चौथे सीट घेऊन प्रवास करणे, रस्त्यावर रिक्षा पार्क करणे, आदी विरोधात चांगलीच झोड उठवल्याने रिक्षा चालकांची चांगलेच धाबे दणाणले आहेत. यामुळे चिंचपाडा, काटेमानवली, सिद्धार्थ नगर, कोळशेवाडी, चक्कीनाका, नेतवली नाका परिसरातील काही रिक्षा चालक भिती पोटी गायब होते. या धडक कारवाईने रिक्षा चालक आणि संघटनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. 

दैनिक सकाळ मध्ये कल्याण डोंबिवली मधील रिक्षा चालकांच्या बेशिस्त पणा, दादागिरी बाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. उशिरा का होईना आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली मात्र यात सातत्य ठेवावे अशी मागणी प्रवासी संघटना अध्यक्ष राजेंद्र फडके यांनी केली आहे.

ही कारवाई एक दिवस नव्हे कायम सुरू राहणार आहे , रिक्षा चालकांनी प्रवासी वर्गाशी सौजण्याने वागावे, सोबत कागदपत्रे ठेवावीत, आज 150 हुन अधिक रिक्षाची तपासणी केली असून 44 रिक्षा वर कारवाई केल्याची माहिती कल्याण पूर्व वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस एन जाधव यांनी सकाळला दिली .

Web Title: Marathi news kalyan news action on auto rickshaw drivers