कल्याण महापालिका संकटात असूनही सदस्यांचा गंगटोक दौरा

Kalyan Dombivali Municipal Corporation
Kalyan Dombivali Municipal Corporation

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका आर्थिक संकटात असल्यामुळे विविध विकास कामांवर गदा आली आहे. मात्र याही परिस्थितीत पालिका सदस्यांच्या गंगटोक दौऱ्याचे नियोजन केले जात आहे. या दौऱ्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विद्यार्थी सेना भीक मागून निधी गोळा करणार आहे. डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे यांनी सोशल मिडियावर आवाहन करत हे आंदोलन करण्याचे जाहिर केले आहे. 

पालिका आयुक्तांनी २६५ कोटींची तुट असल्याचे जाहिर केले आहे. येत्या दोन वर्षात एकही नविन विकास काम हाती घेता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शाळांचे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी विद्यार्थ्यांच्या खात्यात युनिफाॅर्मचे पैसे जमा झालेले नाहीत. पालिका क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंना कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाही किंवा कोणत्याही प्रकारची  मदत केली जात नाही. प्रणव धनावडेसारख्या विक्रमवीर खेळाडूला क्रीडांगणाच्या असुविधेचा सामना करावा लागतो. अशा खेळांडूसाठी पालिका एखादे क्रीडांगण उपलब्ध करून देत नाही. डोंबिवलीतील आनंद बालभवनचा विद्यार्थी वर्गासाठी वापर केला जात नाही किंबहूना त्याबाबतचे कोणतेही धोरण पालिकेने निश्चित केलेले नाही. रस्ते दुरुस्तीसाठीही  पालिकेकडे पैसे नसल्याचे सांगितले जाते. 

पालिका आर्थिक अडचणीत असताना चाळीस लाख रुपये खर्च करुन  नगरसेवकांची प्रशिक्षण सहल का?  आणि कशाला? असे प्रश्न जेधे यांनी उपस्थित केले आहेत. मागील वीस वर्ष सत्ता राबविणारे पालिकेच्या आर्थिक डबघाईची जबाबदारी घेणार का? असेही त्यांनी विचारले आहे. अभ्यास दौऱ्यांवर आत्तापर्यंत झालेला खर्च तसेच त्याचा पालिकेला काय फायदा झाला याची माहिती मिळाली पाहिजे असेही जेधे यांचे म्हणणे आहे. महापौरांनी सामान्य नागरिकांच्या भावनांचा विचार करुन हा दौरा तत्काळ रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र असे झाले नाही तर नागरिकांच्यावतीने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर भीक मागून नगरसेवक दौऱ्यासाठी निधी जमा करुन निषेधात्मक मदत करु असा इशारा जेधे यांनी दिला आहे. हा दौरा सतरा डिसेंबरपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी एक दिवस हे आंदोलन करणार असल्याचे जेधे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com