पुढील वर्षात केडीएमटीला जास्तीत जास्त अनुदान देण्याची मागणी

रविंद्र खरात
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे उत्पन्न वाढीसाठी केडीएमटी प्रशासन आणि समिती सदस्य मेहनत घेत असून आगामी वर्षात पालिकेकडून भरीव मदत घ्यावी अशी मागणी सभापती संजय पावशे आणि परिवहन समिती सदस्यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे केली आहे. 

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे उत्पन्न वाढीसाठी केडीएमटी प्रशासन आणि समिती सदस्य मेहनत घेत असून आगामी वर्षात पालिकेकडून भरीव मदत घ्यावी अशी मागणी सभापती संजय पावशे आणि परिवहन समिती सदस्यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्याकडे केली आहे. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रम दिवसेंदिवस डबघाईला जात असून त्याला बाहेर करण्यासाठी केडीएमटी प्रशासन आणि समिती सदस्य प्रयत्न करत आहे. मात्र पालिकेच्या मदती शिवाय परिवहन उपक्रम पुढे जाऊ शकत नाही. यासाठी परिवहन समिती सभापती संजय पावशे, समिती सदस्य संतोष चव्हाण, राजेंद्र दिक्षित, प्रसाद माळी, सुभाष म्हस्के, संजय राणे, कल्पेश जोशी, मधुकर यशवंतराव आदींच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी (ता. 11) सकाळी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांची भेट घेत परिवहन समितीच्या विविध समस्यांवर चर्चा केली. 

परिवहन महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी अंदाजपत्रक समितीसमोर सादर केल्यानंतर पुढील आठवड्यात सभापती संजय पावशे अंदाजपत्रक स्थायी समिती समोर सादर करणार आहेत. यात मागील वर्षापेक्षा जास्त अनुदान द्यावे, पालिकेच्या वतीने केडीएमटी मध्ये 6 महिन्याच्या धर्तीवर कंत्राटी तत्वावर नोकरभर्ती करावी, केडीएमटीचे वसंत व्हॅली आणि खंबाळपाडा येथे डेपो बनविण्याचे काम सुरू आहे त्याला गती द्यावी, केडीएमटीचे लेखापाल सुधाकर आठवले यांची तब्येत खराब असल्याने पालिकेच्या वतीने केडीएमटीला नव्याने लेखापाल द्यावा. कल्याण मधील गणेशघाट डेपो मध्ये भंगार बसेस उभ्या आहेत त्याचा प्रश्न मार्गी लावावा, आदी विषयावर परिवहन समिती सभापती संजय पावशे आणि सदस्यांनी आयुक्त पी. वेलरासु यांचे लक्ष वेधले असून यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने नवीन वर्षांत केडीएमटीला जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी यावेळी दिले असून आगामी वर्षात केडीएमटीचे चाक गाळातुन बाहेर पडते का? याकडे लक्ष लागले आहे. 

नवीन वर्षात पालिकेने जास्तीत जास्त अनुदान दिल्यास केडीएमटीची अवस्था सुधारू शकतो, अनेक विषय पालिका आयुक्तांच्या परवानगी शिवाय होऊ शकणार नाही म्हणून पालिका आयुक्त यांची भेट सदस्यासमवेत घेतली, त्यांनी आश्वासन दिल्याने आगामी वर्षात केडीएमटी सुधारणा होईल अशी आशा परिवहन समिती सभापती संजय पावशे यांनी व्यक्त केली आहे.

 

Web Title: Marathi news kalyan news kdmt