पगारासाठी 'केडीएमटी'च्या कर्मचाऱ्यांचा सभापतींना घेराव 

रविंद्र खरात
शुक्रवार, 2 मार्च 2018

कल्याण : गेल्या दोन महिन्यांचा पगार थकलेला असतानाच तिसरा महिना आला, तरीही पगार न झाल्याने 'केडीएमटी'च्या कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली काल (गुरुवार) सभापती संजय पावशे यांना घेराव घालण्यात आला. सभापतींच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनही केले; तर दुपारच्या सत्रात गणेशघाट येथील कर्मचाऱ्यांनी 'काम बंद' आंदोलन केले. 

या प्रकरणी पावशे यांनी पगार देण्याचे आश्‍वासन दिले आणि सायंकाळी आयुक्त पी. वेलरासू यांची भेट घेतली. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नसून यासंदर्भात येत्या सोमवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. 'केडीएमटी'चे पाचशेहून अधिक कर्मचारी आहेत. नव्या वर्षातील पहिल्या दोन महिन्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. मार्च महिना उजाडला, तरीही पगाराची चिन्हे नसल्याने कर्मचारी आणि अधिकारी वर्ग त्रस्त झाला आहे. 

मार्चच्या पहिल्या दिवशीच होळी असल्याने सण साजरा करण्यासाठी पैसे पाहिजेत यासाठी कर्मचारी संघटनेने आंदोलन केले. या आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटले. 'केडीएमटी'च्या गणेशघाट येथील डेपोत कर्मचाऱ्यांनी अचानक 'काम बंद' आंदोलन केले. सकाळच्या सत्रात 82, तर दुपारच्या सत्रात केवळ 27 बस रस्त्यावर उतरल्या. बस नसल्यामुळे ऐन होळीच्या दिवशी नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. सभापती संजय पावशे आणि अन्य परिवहन सदस्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर आणखी काही बस रस्त्यावर धावल्या. 

शनिवारी द्वारसभा 
सलग दोन महिने पगार न झाल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियन अध्यक्ष अरविंद मोरे यांनी येत्या सोमवारी (5 मार्च) सकाळपासून चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी 'केडीएमटी' गणेश घाटाच्या प्रवेशद्वारावर उद्या (शनिवार) सकाळी 11 वाजता कर्मचाऱ्यांची सभा होणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

Web Title: marathi news Kalyan News KDMT Buses