मध्य रेल्वेचे कल्याण यार्डमध्ये अडीच तास मॉकड्रील

रविंद्र खरात 
बुधवार, 24 जानेवारी 2018

मध्य रेल्वेच्या मुंबई नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला. कल्याण यार्डमध्ये एका मालवाहतूक ट्रकने मेल गाडीला धडक दिली असून, 6 प्रवासी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. तब्बल 40 मिनिटांत घटनास्थळी मध्य रेल्वेच्या विविध विभागात मदत यंत्रणा पोहचली.

कल्याण :मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कोणत्याही क्षणी कोठेही रेल्वे अपघात झाल्यास सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी किती वेळेत येते आणि आपातकालीन क्षणात कशी एक-दुसऱ्याला मदत करायचे यासाठी कल्याण पूर्वमधील यार्डमध्ये दुपारी दीड ते चार या दीड तास रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेकडून अडीच तास मॉकड्रील घेण्यात आले. 

राज्यातील सर्व शासकीय यंत्रणेत सध्या 'सुरक्षा सप्ताह' साजरा करण्यात येत असून, मध्य रेल्वे ही आपली यंत्रणेत सुरक्षाबाबत विविध उपाययोजना करत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल्वे अपघाताची संख्या कमी असली तरी रेल्वे अपघात झाल्यास घटनास्थळी जाण्यास मार्ग नसताना घटनास्थळी जाऊन मदत कशी करायची यावर आज बुधवार (ता. 24) दुपारी दीड ते दुपारी चार या कालावधीत मॉकड्रील घेण्यात आले. 

मध्य रेल्वेच्या मुंबई नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला. कल्याण यार्डमध्ये एका मालवाहतूक ट्रकने मेल गाडीला धडक दिली असून, 6 प्रवासी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. तब्बल 40 मिनिटांत घटनास्थळी मध्य रेल्वेच्या विविध विभागात मदत यंत्रणा पोहचली.

वैद्यकीय यंत्रणा, रेल्वे सुरक्षा बल, एनडीआरएफची तुकडी, रेल्वेचे तांत्रिक विभाग अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, कुर्ला, कल्याण, इगतपुरी येथील आपत्कालीन पथक असे 300 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घटनास्थळी काम सुरू केले . पहिले विद्युत पुरवठा खंडीत केल्यावर मेल गाडीचा डबा रुळावर आणला. जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरवात केली तर काही ठिकाणी मेल गाडीचा शेड कापून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अचानक आग लागल्याने ती विझवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले तर गंभीर जखमींना रुग्णालयात पाठविण्याची तयारी सुरू होती. केवळ अडीच तासात मदत कार्य पूर्ण झाल्यावर एनडीआरएफच्या जवांनानी 'भारत माता की जय' घोषणा देत आपली मोहीम पूर्ण झाल्याचे घोषित केले.

या मॉकड्रिलमध्ये कल्याण रेल्वे स्टेशन मास्तर प्रदीप कुमार दास मध्य रेल्वे सरंक्षक अधिकारी अशोक कुमार तिवारी, संजीव देशपांडे, एन पी सिंग, आशिष कुमार, वैद्यकीय अधिकारी तिरके यांच्यासह विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

रेल्वे अधिकारी अशोक कुमार तिवारी यांनी मॉकड्रिल का आणि त्यात काय काम केले याची माहिती पत्रकारांना यावेळी दिली . 

Web Title: Marathi News Kalyan news rail mock drill at kalyan yard