पोषक आहार घोटाळा ; मुख्य सूत्रधाराच्या अटकेनंतर आठ जणांना पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी जयपाल गहाणे, स्वयंसहाय्यता बचत गट तुपगावच्या जयश्री पाटील, कल्पना मांजरेकर, तुपगाव येथील कारखान्यात काम करणारे नीलेश शेलार (32), स्वप्नील पंदेकर, उमेश मोहिते, राजेश नेमाणे यांना याआधीच पोलिसांनी अटक केली आहे.

खालापूर : येथील पोषण आहार घोटाळ्याची सूत्रधार वंदना ऊर्फ भक्ती सुनील साळुंखे (वय 49) या महिलेला आज (ता. 24) पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. आज खालापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर या आठही आरोपींना हजर केले असता त्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी जयपाल गहाणे, स्वयंसहाय्यता बचत गट तुपगावच्या जयश्री पाटील, कल्पना मांजरेकर, तुपगाव येथील कारखान्यात काम करणारे नीलेश शेलार (32), स्वप्नील पंदेकर, उमेश मोहिते, राजेश नेमाणे यांना याआधीच पोलिसांनी अटक केली आहे. घोटाळ्याची सूत्रधार वंदना ऊर्फ भक्ती सांळुखे (रा. वरळी, मुंबई) हिला अटक केल्यानंतर या आठही आरोपींना शनिवारी खालापूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता 28 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

पाकिटात 40 टक्के कमी आहार 

मनसेचे खालापूर तालुका अध्यक्ष महेश सोगे यांनी खालापुरातील अंगणवाड्यांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा व कमी वजनाचा असल्याची तक्रार केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. 24 जानेवारीला रात्री सभापती साखरे, उपसभापती विश्‍वनाथ पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पोळ, सुमित खेडेकर, एकात्मिक बालविकासचे चांदेकर यांनी खालापूरचे पोलिस निरीक्षक जे. ए. शेख यांच्या सहाय्याने तुपगाव येथील कारखान्यात छापा मारला.

त्यावेळी त्या ठिकाणी पोषक आहाराची एक हजार 468 पाकिटे जवळपास चाळीस टक्के कमी वजनाची भरलेली आढळली. पोलिसांनी 57 हजार 100 रुपयांचा माल जप्त केला होता. 

Web Title: Marathi News Khalapur News School Food Scam One Woman Arrested