थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला मद्यपी चालकांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. ठाणे शहरातील तलाव, खाडी किनारा, हॉटेल्स आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ठाणे : नववर्ष स्वागताची तयारी सुरू असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी पंचसूत्री तयार केली असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी तब्बल साडेसहा हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत; तर तळीराम चालकांना चाप बसवण्यासाठी 48 ब्रेथ ऍनलायझर यंत्रांसह वाहतूक शाखेच्या 530 अधिकारी व कर्मचाऱ्यांची गस्त सुरू आहे. 

नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये मद्यपान व अमली पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. ठाणे शहरातील तलाव, खाडी किनारा, हॉटेल्स आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच शहरात सर्वत्र नाकाबंदी करून ड्रंक अँड ड्राइव्ह मोहीम राबवण्यात येत आहे. 48 ब्रेथ ऍनलायझर यंत्रांद्वारे वाहनचालकांची तपासणी सुरू असून, मद्यपी चालकांच्या शोधासाठी पोलिसांची फिरती पथकेही तैनात आहेत.

त्यासाठी वाहतूक शाखेचे 80 पोलिस अधिकारी आणि 450 पोलिस कर्मचारी मोहिमेसाठी सज्ज आहेत. त्यानुसार विविध पोलिस ठाणी, मुख्यालय आणि राखीव पोलिस अशा साडेसहा हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात असून 550 पोलिस अधिकारी सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. 

पोलिसांची पंचसूत्री 

* घातपाताचे प्रकार घडू नयेत म्हणून डॉग व अँटी सेबोटेज चेकिंग 

* ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम 

* छेडछाडीला आळा बसावा म्हणून साध्या वेशात बंदोबस्त 

* मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी पायी व मोबाईल पेट्रोलिंग 

* शहरातील महत्त्वाचे चौक, प्रमुख मार्गांवर नाकाबंदी आणि पार्टीच्या ठिकाणी बंदोबस्त 

 

Web Title: marathi news local news mumbai news police takes action against drunk drivers