नैसर्गिक हवेवर चालणारा एसी! 

किरण कारंडे
रविवार, 31 डिसेंबर 2017

मुंबई : एअर कंडिशनरचा वापर करून कारखाने, कार्यालयांतील वातावरण थंड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज लागते. पर्यावरणास हानिकारक असलेल्या गॅसचेही यामुळे उत्सर्जन होते; पण दिल्लीच्या एका तरुणाने नैसर्गिक पद्धतीचा वापर करत उष्ण तापमान कमी करण्याचे नवीन तंत्र तयार केले आहे. दिल्ली, मुंबई, पुणे आणि अबुधाबीतही या तंत्रज्ञानाची मागणी होऊ लागली आहे. 

"बिहिव्ह नॅचरल कूलिंग' पद्धत म्हणजे प्राचीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय आहे. मातीच्या कूलिंग पाइपचा वापर करत वातावरण थंड करण्यासाठी याचा वापर होतो. सरासरी 12 ते 15 डिग्री सेल्सिअस तापमान कमी करण्यासाठी ही कूलिंग सिस्टीम उपयुक्त ठरते. नैसर्गिक पद्धतीने एअर कूलिंगचे तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात येते. पर्यावरणपूरक असे हे तंत्रज्ञान आहे. महत्त्वाचे म्हणजे, या तंत्रज्ञानामुळे कुंभारांसारख्या स्थानिक कारागिरांना अधिक काम मिळणे शक्‍य होणार आहे. या सिस्टीममध्ये पाण्याचा वापर करण्यात येतो. उष्णतेचे रूपांतर बाष्पात होऊन तापमान कमी करण्यासाठी याची मदत होते. या सिस्टीमसाठी वापरण्यात आलेल्या पाण्याचा पुनर्वापरही करता येतो. उद्योगांबरोबरच हे मॉडेल घरगुती वापरासाठीही वापरता येते, असे या तंत्रज्ञानाचा विकास करणाऱ्या मोनिश सिरीपुरा यांनी सांगितले. 

दिल्लीत या तंत्रज्ञानाचा प्रथम वापर करण्यात आला. त्यानंतर मुंबईत सध्या एका फूड इंडस्ट्रीसाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे. बाष्पीभवनासोबतच हे तंत्रज्ञान धूलिकरण कमी करण्यासाठीही मदत करते. या तंत्रज्ञानाला देखभाल आणि दुरुस्तीचा विशेष खर्च येत नाही. सुरवातीला विटांचा वापर करून कूलिंग सिस्टीम विकसित करण्यात आली होती; मात्र पुढच्या टप्प्यात मातीच्या पाइपचा वापर करण्यात आला. मुंबईत एका कौलारू घरासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. लवकरच अनेक शहरांत हे कूलिंग तंत्रज्ञान वापरण्यात येईल, असे मोनिश यांनी सांगितले. 

Web Title: marathi news local news natural AC on air