मिळो तुला तो मान बाबा भीमामुळे...

सुनील पाटकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

महाड - ‘किती गीतं लिहिली आपण आणि किती कोणी नेली, याची गणती नाही’ अशी बेफिकीर बतावणी करणारा कवनांचा राजा रवींद्र धोत्रे अनेक गायकांना प्रसिद्धीच्या शिखरावर चढवून आज वयाच्या सत्तरीत कफल्लकतेचे जीणे जगत आहे. ‘झालास तू बलवान बाबा भीमामुळे; मिळे तुला तो मान बाबा भीमामुळे’ या धोत्रे यांच्या प्रसिद्ध गीतातून उसनवारी करून त्यांच्याबद्दलही ‘मिळे तुला तो मान बाबा भिमामुळे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

महाड - ‘किती गीतं लिहिली आपण आणि किती कोणी नेली, याची गणती नाही’ अशी बेफिकीर बतावणी करणारा कवनांचा राजा रवींद्र धोत्रे अनेक गायकांना प्रसिद्धीच्या शिखरावर चढवून आज वयाच्या सत्तरीत कफल्लकतेचे जीणे जगत आहे. ‘झालास तू बलवान बाबा भीमामुळे; मिळे तुला तो मान बाबा भीमामुळे’ या धोत्रे यांच्या प्रसिद्ध गीतातून उसनवारी करून त्यांच्याबद्दलही ‘मिळे तुला तो मान बाबा भिमामुळे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

शाहीर विठ्ठल उमप, गायक प्रल्हाद शिंदे यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या सहवासात घडले-वावरलेले महाडमधील कवी रवींद्र धोत्रे आज चवदार तळ्याच्या साक्षीने उपेक्षेचे जीणे जगत आहेत. वर्षभरापासून अर्जविनंत्या करूनही त्यांना सरकारकडून मानधन मिळालेले नाही. महाड शहराजवळील लाडवली बौद्धवाडी येथील रवींद्र धोत्रे यांचे शिक्षण मुंबईत झाले. बी.जे. देवरुखकर मार्गावरील महापालिकेच्या मराठी शाळेत जेमतेम सहावी झालेल्या धोत्रे यांना गीतलेखन व संगीताची मोठी आवड व जाण आहे. मुंबईत बेस्टमध्ये तात्पुरती कामगाराची नोकरी करत असतानाही त्यांनी आपली ही आवड जपली. अशा काळातच जयंताबाई आडे या गायिकेने रवींद्र धोत्रे यांना सिनेमाच्या चालीवर गीत लिहिण्यास प्रवृत्त केले. ज्या बी.डी.डी. चाळीत प्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप राहत होते, त्याच चाळीत धोत्रेही राहायचे. यामुळे या प्रसिद्ध शाहिरांच्या सान्निध्यात त्यांना कायम राहता आले. 

गाण्याचा छंद वाढीस गेला आणि नोकरीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे धोत्रे यांना नोकरी गमवावी लागली. त्यातच धोत्रे यांची दोन मुले आणि आई अशी तीन माणसे एकाच महिन्यात दगावली. त्यामुळे त्यांना मुंबई सोडून १९८१ मध्ये गावी यावे लागले. 

आज वयाच्या सत्तराव्या वर्षीही धोत्रे यांनी आपला छंद जोपासला आहे. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, भजनसम्राट वामनबुवा खोपकर, श्रावण यशवंते या दिग्गज गायकांपासून आजच्या रेश्‍मा सोनावणेपर्यंत अनेक गायकांनी धोत्रे यांनी लिहिलेली गाणी गायली आहेत. आपल्या आयुष्यात कलेला महत्त्व देणाऱ्या या गीतकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुतिसुमने लिहिण्यात धन्यता मानली. प्रेमगीत, शायरी, सवाल-जबाब, भीमगीत अशी अनेक प्रकारची गाणी त्यांनी लिहिली आहेत. 

गतकाळात किती गीते लिहिली आणि कोणी किती नेली, याचा काही हिशेब नसल्याचे धोत्रे सांगतात! आजही एखादा गायक आपले गीत गायल्यानंतर प्रामाणिकपणे मानधन आणून देतो; पण त्याच्यावर घर चालत नाही. सरकारकडून व अन्य कोणाकडून काहीच मदत मिळत नसल्याने धोत्रे हलाखीच्या स्थितीत जगत आहे. याही परिस्थितीत ते त्याच दमाने गीते लिहून चाली देतात. ‘झालास तू बलवान बाबा भीमामुळे; मिळे तुला तो मान बाबा भीमामुळे’ हे प्रसिद्ध गीत धोत्रे यांनी लिहिले आहे. गायक प्रल्हाद शिंदे यांनीदेखील त्यांचे ‘माझी बायको लय लाजाळू’ हे लोकगीत गायले आहे. नव्या दमाच्या गायिका उषा शेजोले यांनी ‘पहाटे पहाटे उठवतो मला, माझा बाय नवरा नटवतो मला’ अशी लोकगीते गायली आहेत. ‘कान्हा वाजव रे वाजव’ ही धोत्रे यांनी लिहिलेली गवळण शकुंतला जाधव यांनी गायली आहे. लोकगीत गायक प्रवीण निकाळजे यांनी धोत्रे यांनी लिहिलेले ‘कवडीचं ज्ञान नाही कायद्याच, जो तो बघतोय आपल्या फायद्याच’ हे गीत गायिले आहे. धोत्रे यांनी लिहिलेल्या ‘माझ्या भरताराचं कौतुक मावेना पोटात’ हे गाणे सुषमादेवी यांनी गायिले. त्याला श्रोत्यांनी मोठी दाद दिली आहे. धोत्रे यांच्या गीतांच्या किमान ४० सीडी प्रसिद्ध झाल्या आहेत. चवदार तळ्याच्या काठावर बसून त्यांना ही गीते लिहिण्याची प्रेरणा मिळते. त्यांना भेटण्याचे ठिकाणदेखील चवदार तळेच. अनेक गायक त्यांना भेटण्याकरिता याच ठिकाणी येतात. 

गीत लिहिण्याची आपली प्रेरणा विठ्ठल उमप आहेत. तेच माझे गुरू राहिले आहेत. अनेक गायकांना गाणी लिहून देत असानाच चालही देत असतो. चालीवर शब्द रचले जातात. सरकारने लोककवींची दखल घेतली पाहिजे. 
- रवींद्र धोत्रे, कवी  

Web Title: marathi news mahad ravi dhotre